Pune : कोथरूड सांस्कृतिक महोत्सव संगीतमार्तंड पं. जसराज यांना समर्पित

येत्या १ ते ४ फेब्रुवारी दरम्यान रंगणार ‘रसराज सन्मान सोहळा’; पं. सुहास व्यास व पं. विजय घाटे यांचा होणार विशेष सन्मान

एमपीसी न्यूज – पुण्यातील संस्कृती प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेला कोथरूड सांस्कृतिक महोत्सव या वर्षी येत्या शनिवार (दि. १ फेब्रुवारी) ते मंगळवार (दि. ४ फेब्रुवारी, २०२०) दरम्यान होणार आहे. कोथरूड येथील आयडियल कॉलनी मैदानावर सायंकाळी सहा वाजल्यापासून हा महोत्सव पार पडणार असून, बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत महोत्सवा अंतर्गत होणा-या विविध कार्यक्रमांची माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थितांना दिली.

हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असणार आहे. कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचे हे सलग १० वे वर्ष असल्याचे सांगत मुरलीधर मोहोळ म्हणाले, “नासा या अंतराळ संशोधन संस्थेबरोबरच आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र विभागाने यावर्षी पं. जसराज यांच्या नावाने नव्याने शोध लागलेल्या एका ग्रहाचे नामकरण केले. अशा पद्धतीचा बहुमान मिळालेले पद्मविभूषण पं. जसराज हे पहिलेच भारतीय आहेत. याचेच औचित्य साधत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार यानिमित्ताने पं. जसराज यांना सांगीतिक मानवंदना देणार आहेत. याबरोबरच २८ जानेवारी रोजी पं. जसराज यांनी आपल्या वयाची ९० वर्षे पूर्ण केली आहेत. अशा पद्धतीने या दुहेरी कारणाने पं. जसराज यांना यावर्षीचा कोथरूड सांस्कृतिक महोत्सव आपण समर्पित करीत आहोत.”

महोत्सवाचे पहिले दोन दिवस आपण योगेश देशपांडे यांच्या संकल्पनेतून ‘रसराज सन्मान सोहळा’ साजरा करणार असल्याचेही यावेळी मोहोळ यांनी सांगितले. रसराज सन्मान सोहळ्याची निर्मिती हेमंत गुजराती, पुणे टॉकीज यांची असून त्यासाठी पं. जसराज स्कूल ऑफ म्युझिक फाऊंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

‘रसराज सन्मान सोहळा’ या अंतर्गत महोत्सवाच्या पहिल्या दिवशी (शनिवार, दि. १ फेब्रुवारी) भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आणि ज्येष्ठ संगीतकार पं. हदयनाथ मंगेशकर या मान्यवरांच्या हस्ते संगीतमार्तंड पं. जसराज यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येईल. यानंतर पं. जसराज स्कूल ऑफ म्युझिक फाऊंडेशन या संस्थेचे विद्यार्थी आपल्या गायनाने कार्यक्रमाला सुरुवात करतील. त्यानंतर पं. जसराज यांचे नातू व गायक स्वर शर्मा यांचे गायन होईल.

प्रसिद्ध सरोद वादक अमजद अली खान यांचे सरोदवादन अनुभविण्याची संधी यानंतर उपस्थितांना मिळेल. त्यानंतर उस्ताद तौफिक कुरेशी व त्यांचे पुत्र शिखर कुरेशी यांचे जेंबे वादन होईल. पहिल्या दिवसाचा समारोप प्रसिद्ध पार्श्वगायक व गझल गायक हरिहरन यांच्या ‘लाईव्ह गजल्स’ने होईल.

महोत्सवाच्या दुस-या दिवसाची (रविवार, दि. २ फेब्रुवारी) सुरुवात राकेश चौरासिया यांच्या सुमधुर बासरीवादनाने होईल. यानंतर पं. जसराज यांचे शिष्य पं. संजीव अभ्यंकर व ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांचा ‘जसरंगी’ हा जुगलबंदीचा कार्यक्रम सादर होईल. दुस-या दिवसाचा समारोप हा पं. जसराज, पं. हरिप्रसाद चौरासिया, डॉ. प्रभा अत्रे व पं. हदयनाथ मंगेशकर यांच्या गप्पांच्या कार्यक्रमाने होईल. यावेळी योगेश देशपांडे हे या तिघांशी संवाद साधतील.

महोत्सवाच्या तिस-या दिवशी रामकृष्ण मठ, पुणे निर्मित ‘युगनायक विवेकानंद’ या महानाट्याचे सादरीकरण होईल. स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो धर्म परिषदेतील प्रसिद्ध भाषणाला १२५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. स्वामी श्रीकांतानंद यांनी सदर नाट्याचे लेखन केले असून केदार पंडित यांनी नाट्य व संगीत दिग्दर्शन केले आहे. मंगळवार दि. ४ फेब्रुवारी रोजी ‘चला हवा येऊ द्या’ या दूरचित्रवाणीवरील प्रसिद्ध कार्यक्रमाच्या लाईव्ह एपिसोडने १० व्या कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप होईल.

संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी कोथरूडस्थित कलाकारांना पुरस्कार देत गौरविण्याची परंपरा आहे. या वर्षी ‘संस्कृती कला जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. सुहास व्यास यांना तर ‘संस्कृती कला पुरस्कार’ प्रसिद्ध तबलावादक पं. विजय घाटे यांना देण्यात येणार आहे. मानपत्र, मानचिन्ह असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप असेल, अशी माहितीही यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी दिली. या पुरस्कारांचे वितरण रविवार दि. 2 फेब्रुवारीला महोत्सवा दरम्यान होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.