Kothrud : कोथरूड भागात रॅपिड अँटीजेन टेस्टिंग सुविधा सुरू करा – पृथ्वीराज सुतार 

Start Rapid Antigen Testing Facility in Kothrud Area - Prithviraj Sutar

एमपीसी न्यूज – कोथरूड भागात रॅपिड अँटीजेन टेस्टिंग सुविधा सुरू करा, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. 

कोथरूड परिसरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या भागातील रुग्णांचे स्वाब टेस्ट घेण्याचे केंद्र कै. अण्णासाहेब पाटील महापालिकेच्या शाळेत आहे. तेथे रोज फक्त 50 ते 60 रुग्णांची टेस्ट घेण्याची व्यवस्था आहे. त्याचे रिपोर्ट मिळण्यास साधारण 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागतो. त्या कालावधीत पॉझिटिव्ह होणारे रुग्ण इतर नागरिकांमध्ये मिसळतात. त्यामुळे कोथरूड भागात नवीन रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळत आहे. त्या रुग्णांच्या प्रमाणात नागरिकांच्या स्वाब टेस्ट होत नाहीत.

पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी कोथरूड परिसरातील कै. अण्णासाहेब पाटील महापालिकेच्या शाळेत रॅपिड अँटीजेन टेस्टिंग सुविधा डॉक्टर, सेवक, आणि आवश्यक त्या यंत्रणेसह  त्वरित सुरू करावी, अशी विनंती पृथ्वीराज सुतार यांनी पत्रात केली आहे.

दरम्यान, कोथरूड भागात रॅपिड अँटीजेन टेस्टिंग सुविधा सुरू झाल्यास तातडीने कोरोना रुग्ण समोर येणार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे सोपे होणार आहे. केवळ अर्ध्या तासात या टेस्टमुळे कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह ही माहिती समजते. त्यामुळे कोथरूड परिसरात ही टेस्ट होणे गरजेचे असल्याचे पृथ्वीराज सुतार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.