Kozhicode Plane Accident Update: विमान अपघातातील मृतांचा आकडा 19 वर

एमपीसी न्यूज – वंदे भारत अभियानांतर्गत दुबईहून 174 प्रवासी घेऊन जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान काल रात्री पावणेआठच्या सुमारास केरळमधील कोझिकोड विमानतळावर कोसळून झालेल्या भीषण अपघातात वैमानिक व सहवैमानिकासह 19 जणांचा मृत्यू झाला. 

केरळ विमान अपघातात बचावकार्य पूर्ण झाले आहे. आतापर्यंत 19 लोकांच्या मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे, तर विमानातील 170 प्रवासी बचावले आहेत. जखमींना मल्लापुरम आणि कोझिकोड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही घटना घडली तेव्हा तेथे हवामान खराब होते, जोरदार पाऊस सुरू होता आणि दिसण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे विमान धावपट्टीवरून घसरले आणि सुमारे 35 फूट खोल दरीत पडून ही दुर्घटना घडली. विमानाचे दोन तुकडे झाले. सुदैवाने विमानाने पेट घेतला नाही. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

कोझिकोड विमानतळ हे पठारावरील विमानतळ असल्याने या ठिकाणी विमान उतरविणे आव्हानात्मक मानले जाते. या विमानात 174 प्रवासी, 10 मुले, दोन पायलट आणि पाच केबिन क्रू असे एकूण 191 जण होते, अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिली आहे.

एअर इंडिया एक्सप्रेसच्या वतीने अपघाताबाबत रात्री उशिरा बुलेटीन जारी करण्यात आले. त्यात म्हटले आहे की,  एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेडने याची पुष्टी केल्याबद्दल खेद व्यक्त करते की, त्याचे दुबई ते कोझिकोड या आयएक्स -1344 हे विमान होते. ते 7 ऑगस्ट 2020 रोजी कालिकत येथे अपघातग्रस्त झाले. त्यात आतापर्यंत दोन वैमानिकांसह 17 जणांचा मृत्यू झाला आहे. चार केबिन क्रू मेंबर सुरक्षित आहेत.

आपत्कालीन प्रतिसाद कार्यसंघ सदस्य तसेच विशेष सहाय्य कार्यसंघ सदस्य (एंजल्स एअर इंडिया) च्या कोचिन, मुंबई व दिल्ली येथून सर्व मदत पथकांना पाचारण करण्यात आले आहे. अपघातग्रस्त प्रवाशांना तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शक्य मदत करण्यात येत आहे. मानवतावादी दृष्टीकोनातून मुंबई व दिल्ली येथून खास मदत उड्डाणांची व्यवस्था करण्यात आली आहे, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेडने प्रवासी माहिती केंद्र आणि एक टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. अपघातग्रस्त विमानातील प्रवाशांचे कुटुंबीय व मित्र-आप्तेष्ट टोल फ्री क्रमांक 1800222271 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. परदेशातून कॉल करणार्‍यांसाठी कृपया आधी देशाचा कोड नंबर डायल करून मग टोल फ्री नंबर डायल करावा, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड उपलब्ध होताच अधिक माहिती जाहीर करेल. एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेडच्या www.airindiaexpress.in या वेबसाइटवर अद्ययावत माहितीदेखील पोस्ट केली जाईल, असे एअर इंडिया एक्सप्रेसने म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.