Pune : कृष्ण जन्माष्टमीनिमित्त सामूहिक बासरीवादन

सौरभ फ्ल्यूट अकॅडमीच्या ७० विद्यार्थ्यांचे इस्कॉन मंदिरात सादरीकरण

एमपीसी न्यूज – ओम जय जगदीश हरे, वैष्णव जन तो तेने कहिये, रघुपति राघव राजाराम, हरे रामा हरे कृष्णा अशी मनाला भिडणारी भजने, दुर्गा, भूपाळी रागातील स्वर बरसात करीत कृष्ण जन्माष्टमीनिमित्त सामूहिक बासरीवादन झाले. पुण्यातील सौरभ फ्ल्यूट अकॅडमीच्या ७० विद्यार्थ्यांनी इस्कॉन मंदिरात भगवंतासमोर आपली कला सादर केली. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन मंदिरामध्ये कृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

त्यामध्ये रविवारी सौरभ फ्ल्यूट अकॅडमीच्या सौरभ वर्तक व त्यांच्या ७० शिष्यांनी सामूहिक बासरीवादन केले. सामूहिक बासरीवादनात रोहित मुजुमदार यांनी तबल्यावर, तर कृष्णा साळुंखे यांनी पखवाजावर साथ केली. यावेळी झालेल्या भजन व रागांच्या सादरीकरणाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.

प्रसंगी चित्कला मुळ्ये, अदिती मुळ्ये, इस्कॉन मंदिरातील विश्वस्त श्वेतद्वीप दास व सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख श्रीधर कृष्ण दास उपस्थित होते. यावेळी सौरभ वर्तक म्हणाले, “बासरी कृष्णाचे अतिशय प्रिय असे वाद्य आहे. कृष्ण जन्माच्या निमित्ताने भगवान कृष्णाप्रती सद्भाव व्यक्त करण्यासाठी माझ्यासह शिष्यानी सामूहिक बासरीवादन केले. सौरभ फ्ल्यूट अकॅडमीच्या ७० शिष्यांना घेऊन ही स्वरांची बरसात आम्हाला करता आली, याचा आनंद आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.