Pune : सनदी लेखापालांमुळे ‘जीएसटी’ संकलनात मोठी वाढ – कृष्णा मिश्रा

'आयसीएआय'तर्फे 'जीएसटी'वर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद

एमपीसी न्यूज – “वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठीच आणलेला आहे. त्यामध्ये सुधारणेला जरुर वाव असून, त्यासाठी जीएसटी कौन्सिल नियमित बैठक घेऊन ‘जीएसटी’ला ‘गुड अँड सिम्पल टॅक्स’ बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. गेल्या दोन वर्षात चार्टर्ड अकाउंटंट अनेक महत्वाच्या सेवा पुरवीत  आहेत. या सर्वांमुळे ‘जीएसटी’मुळे कर संकलनात मोठी वाढ झाली आहे,” असे मत ‘सीजीएसटी’च्या प्रधान मुख्य आयुक्त कृष्णा मिश्रा यांनी केले.

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वतीने ‘जीएसटी’वर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कोथरूड येथील एमआयटीच्या स्वामी विवेकानंद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी ‘सीजीएसटी’चे आयुक्त राजीव कपूर, ‘आयसीएआय’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष सीए अतुल गुप्ता, केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, पुणे शाखेच्या अध्यक्षा सीए ऋता चितळे, ‘आयसीएआय’चे सीए सुशीलकुमार गोयल, सीए राजेंद्र कुमार, सीए यशवंत कासार, सीए आनंद जाखोटिया, सीए समीर लड्डा, सीए अभिषेक धामणे, सीए काशिनाथ पठारे, यशवंत कासार आदी मान्यवर उपस्थित होते.

सीजीएसटी कमिशनर राजीव कपूर म्हणाले, “ऑनलाईन जीएसटी भरण्यात तक्रारी येत आहेत. त्यांना त्वरित मदत करणे गरजेचे आहे. ‘सब का विश्वास’ अंतर्गत अभियान सुरु आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जीएसटी समाजाने काहीजणांना अवघड असल्याने अनेक अडचणी जाणवतात. मात्र, त्या समजून सांगतानाच सोडविण्याचाही प्रयत्न केला जात आहे.

जीएसटी भरणा करून करदात्यांनी सरकारला सहकार्य केले पाहिजे. बोगस जीएसटी बिल काढण्याचे प्रमाण वाढत आहेत, त्यांना पकडणे सहज शक्य आहे. प्रत्येकाला एकाच छत्राखाली घेऊन येणे खूप कठीण आहे, त्यामुळे थोडा वेळ लागेल परंतु सर्व काही सुरळीत होईल.”

अतुल गुप्ता म्हणाले, “सीए हा देशाच्या विकासात, तसेच सामाजिक आणि आर्थिक सुधारणांमध्ये मध्यस्थ म्हणून सीएची भूमिका महत्वाची आहे. सीएची गुणवत्ता अबाधित करण्यासाठी ‘आयसीएआय’कडून सतत उपक्रम राबविण्यात येतात. डिजिटल हब, युडीआयएन यासारखे व्यासपीठ उभारले आहेत. सीए आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी नवीन तंत्रज्ञानाचा मेळ घालत अभ्यासक्रम अद्ययावत केला जात आहे. नियमित मार्गदर्शन सत्र, कार्यशाळा घेऊन सीए अधिकाधिक प्रगल्भ होईल, यावर भर दिला जात आहे. सीएचे काम, सेवा स्वयंचलीत आणि चांगली करण्यासाठी ‘आयसीएआय’ प्रयत्नशील आहे.”

प्रास्ताविकात चंद्रशेखर चितळे यांनी ‘सनदी लेखापाल जीएसटीला अधिक सुलभ करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी लक्षात आणून देत योग्य त्या सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील आहे, आणि सनदी लेखापालांचे योगदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील गौरविले आहे’ असे सांगितले. सीए ऋता चितळे व सीए अभिषेक धामणे यांनी परिषदेच्या आयोजनामागील भूमिका मांडली. सीए नेहा फडके, सीए ऐश्वर्या गुंदेचा, पूजा महेश्वरी, राजश्री सहल यांनी सूत्रसंचलन केले. सीए काशिनाथ पठारे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.