Krishna Prakash : कृष्ण प्रकाश यांच्या विरोधातील ‘ते’ पत्र बनावट असल्याचा दावा

'तो मी नव्हेच' म्हणत अर्जदारानेच दिले पोलीस आयुक्तांकडे स्पष्टीकरण

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेला कथित गैरव्यवहार मांडणारे चार पानांचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पत्र कृष्ण प्रकाश (Krishna Prakash) यांच्या कार्यकाळात त्यांचे वाचक (रिडर) असलेल्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या नावाने थेट मुख्यमंत्र्यांना लिहिले गेले आहे. त्यामुळे पोलीस दलातील सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान संबंधित सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले असून व्हायरल होणारे पत्र बनावट असून त्यातील अर्जदार आपण नसल्याचे तसेच याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांच्या नावाने मुख्यमंत्र्यांना लिहलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या कार्यकाळात काही गैरव्यवहार झाले असल्याचे म्हटले आहे.

व्हायरल झालेल्या पत्रात असेही म्हटले आहे की, ‘कृष्ण प्रकाश यांनी दीड वर्षात केलेल्या चुकीच्या कामात मला गोवण्याची शक्यता आहे. कृष्ण प्रकाश यांनी सामाजिक सुरक्षा हे स्वतंत्र पथक स्थापन करून त्याचे प्रमुख पद दिले. सामाजिक सुरक्षा पथकाच्या बरोबरीने वाचक शाखेचे काम बघण्यास सांगण्यात आले.

या कालावधीत शहरातील अनेक जमिनीच्या खरेदी विक्रीची प्रकरणे हाताळण्यास सांगितले जात होते. यातून करोडो रुपये पैसे मला स्वीकारण्यास सांगितले. ही रक्कम 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कृष्ण प्रकाश यांनी मला नेमण्याचे कारण कालांतराने समोर आले. पण मी कनिष्ठ असल्याने हे सगळं करण्यापलीकडे पर्याय नव्हता.

मला इच्छा नसतानाही ते सांगतील त्या प्रमाणे कामे करावी लागली आहेत. अनेक बांधकाम व्यावसायिक आणि काही महिलांशी संबंधित नको ती कामे मला करावी लागली आहेत, असेही पत्रात म्हटले आहे.

सेवा विकास बँक घोटाळा प्रकरणात सगळ्या संचालकांना अटक करण्याचे आदेश असताना एका संचालकाला अटक न करण्यासाठी साडेतीन कोटी रुपये घेण्यात आले. पिंपरीतील एका बेटिंग चालकाला अटक न करण्यासाठी अडीच कोटी रुपये घेण्यात आले, असे सांगत यात चार पोलीस निरीक्षक आणि काही माध्यम प्रतिनिधींची देखील नावे आहेत. तसेच चार सहाय्यक पोलीस आयुक्तांना या प्रकारणांबाबत माहिती असल्याचे पत्रात म्हटले आहे.

Bhosari News : मंडल अधिकारी महिलेवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी ; राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

मीडियासोबतच काही सामाजिक कार्यकर्त्यांचा देखील वापर तत्कालीन आयुक्त कृष्ण प्रकाश (Krishna Prakash) यांनी त्यांची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे पत्रात म्हटले आहे. कृष्ण प्रकाश यांनी सांगली, उस्मानाबाद, अहमदनगर आणि मुंबई मधील काही लोकांना पैसे कमविण्यासाठी आणि डील फायनल करण्यासाठी शहरात आणले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांगण्यावरून अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींना होईल, अशी चुकीची कामे करण्यात आली आहेत. येत्या काळात ही प्रकरणे उघड होण्याची दाट शक्यता असल्याने याची मला भीती वाटू लागली असल्याचेही अर्जदाराने व्हायरल पत्रात म्हटले आहे.

मॅट मधून बदली रद्द करून आलेल्या निरीक्षकांकडून जबरदस्तीने पूर्वीच्या ठिकाणी नियुक्ती नको असे लिहून घेत अनेक प्रकारे अन्याय केला आहे. शहरातील चार निरीक्षक आणि एक सहाय्यक आयुक्त दिवसभर आयुक्तालयात बसून सगळे व्यवहार सांभाळत होते. यातील एकही पैशाचा वापर मी माझ्या वैयक्तिक कामासाठी कधीही केलेला नाही.

याबाबत मुंबईच्या अति वरिष्ठ अधिका-यांना मी कळविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे मी माझी कैफियत आपल्या समोर मांडत आहे. हा अर्ज आपणापर्यंत आल्यावर तो मी लिहिलाच नाही असे सांगण्यासाठी माझ्यावर खूप दबाव येण्याची शक्यता आहे. तसेच तो बदलावा असेही मला धमकाविण्यात येऊ शकते, असेही व्हायरल झालेल्या पत्रात शेवटी म्हटले आहे.

Pune News : गुंड आप्पा लोंढे खून प्रकरणी 6 जणांना जन्मठेप, 9 जणांची निर्दोष मुक्तता

याबाबत खुलासा करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, डिसेंबर 2019 साली मी मुंबई शहर येथून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पदोन्नतीवर हजर झालो. जुलै 2021 पासून तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Krishna Prakash) यांचा वाचक म्हणून कर्तव्यावर होतो. 6 मी रोजी पिंपरी पोलीस ठाणे येथे बंदोबस्तावर असताना सोशल मीडियावर चार पानांचे पत्र वाचण्यास मिळाले असल्याचे डोंगरे यांनी लिहिले आहे.

तसेच डोंगरे यांनी पुढे म्हटले आहे की, मी वाचक म्हणून काम करत असताना काही पत्रकारांच्या, सामाजिक कार्यकर्ते यांच्या नावाचा उल्लेख करून माझ्या व तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या बाबत खोट्या मजकुराची असंबंध माहिती लिहून माझी व तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदनामी करण्यासाठी बनावट दस्ताऐवज मुख्यमंत्री यांच्या नावे तयार केला असल्याचे म्हटले आहे.

या पत्रात चुकीच्या, खोट्या माहितीमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन, बदनाम करण्याचा कुटील डाव करणा-यास अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्यासाठी माझे नाव वापरून व माझी खोटी सही करून ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल करणा-या अज्ञात इसमाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची विनंती देखील सहाय्यक निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.