रविवार, सप्टेंबर 25, 2022

Kudalwadi News : महापालिकेकडून चक्क नाल्यावर ‘एसटीपी’ची उभारणी!

एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Kudalwadi News) पर्यावरण विभागातर्फे चिखली, कुदळवाडी येथे चक्क नाल्यावरच तीन एलएलडी क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे (एसटीपी) काम सुरू असल्याचा प्रकार निदर्शास आला आहे. या प्रकल्पासाठी तब्बल आठ कोटी रूपये खर्च होणार आहेत.

चिखली, कुदळवाडी भागात मोठ्या प्रमाणात नागरिकरण होत आहे. तसेच या भागात लघुउद्योग, भंगार गोदामे मोठ्या प्रमाणात आहेत. कारखान्याचे पाणी, सांडपाणी थेट इंद्रायणी नदीत सोडले जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने वारंवार महापालिकेला चिखली परिसरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार महापालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे निविदा प्रक्रिया राबवून मार्करस या ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे. या कामासाठी महापालिका आठ कोटी रूपयांचा खर्च करणार आहे.

देहू-आळंदी रस्त्यालगत कुदळवाडी परिसरात भला मोठा नाला आहे. या नाल्यातील पाणी थेट इंद्रायणी नदीत जात आहे. त्यामुळे याच नाल्यावर महापालिकेने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. दुसरीकडे वाढत्या नागरिकरणामुळे शहरातील नैसर्गिक ओढे-नाले बुजवून उंचच्या-उंच इमारती उभ्या केल्या जात आहेत. यावर महापालिकेचा अतिक्रमण विभाग कधी कारवाई करतो तर कधी-कधी सोयीस्करपणे कानाडोळा करत असतो. मात्र, नैसर्गिक ओढे-नाले बुजविल्यामुळे शहरातील आजही अनेक भागात पुराचा धोका संभवतो. असे असताना महापालिका प्रशासन स्वतःच नाल्यावर असे प्रकल्प उभारत (Kudalwadi News) आहे.

याबाबत बोलताना महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी म्हणाले, “महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या परवानगीनेच कुदळवाडीत नाल्यावर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत आहे. नाल्यामध्ये जरी काम होत असले तरी उभारण्यात येणाऱ्या पिलर्सची उंची जास्त आहे. त्यामुळे पाणी जाण्यास कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. या नाल्यात येणारे तीन एमएलडी पाणी शुध्द करून परिसरातील सोसायट्यांमधील उद्यानासाठी, बांधकामासाठी देण्यात येणार आहे. संबंधित ठेकेदार 1 वर्षांत हे काम पूर्ण करणार असून 5 वर्ष देखभाल दुरूस्ती करणार आहे”.

spot_img
Latest news
Related news