Kudalwadi News: महापालिका शाळांमधून अनेक तंत्रज्ञ, अभियंते निर्माण होतील – महापौर ढोरे

महापालिकेतर्फे उभारलेल्या प्राथमिक शाळेचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – संगणकाच्या आजच्या आधुनिक युगात महापालिकेच्या शाळातून देखील विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण प्राधान्याने देण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात महापालिका शाळांमधून अनेक संगणक तंत्रज्ञ, संगणक अभियंते निर्माण होतील, असा विश्वास महापौर उषा ढोरे यांनी व्यक्त केला.

महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 11 मधील कुदळवाडी येथील नव्याने बांधण्यात आलेल्या प्राथमिक शाळेचे उद्घाटन महापौर ढोरे यांच्या हस्ते आज (सोमवारी) झाले. उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, फ प्रभाग अध्यक्ष कुंदन गायकवाड, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक संजय नेवाळे, नगरसेविका योगिता नागरगोजे, अश्विनी बोबडे, माजी नगरसेवक भिमा बोबडे, स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य आनंदा यादव उपस्थित होते.

कुदळवाडी येथील नव्याने बांधण्यात आलेल्या या इमारतीचे जागेचे क्षेत्रफळ 2112 चौरस मीटर असून त्यावर 1679 चौरस मीटरचे तळमजला अधिक 3 मजले असे बांधकाम आहे. त्यामध्ये 24 खोल्या असून त्यात 16 वर्ग खोल्या, चित्रकला कक्ष, शिक्षक कक्ष, प्रशासन कक्ष, ग्रंथालय, संगणक कक्ष, प्रयोगशाळा सभागृह आणि मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह यांचा समावेश आहे. संगणक शिक्षणाकरीता ई-लर्निंगद्वारे शिक्षणाची सोय आहे. या शाळेसाठी सुमारे 4 कोटी 60 लाख रुपये इतका खर्च झालेला आहे.

”शिक्षणाचा स्तर व्यक्तीची सामाजिक आणि कौटुंबिक ओळख वाढवतो. शिक्षणामुळे कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय समस्यांवर मात करण्याकरीता क्षमता मिळते. या भागातील शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींना शाळेकरीता दूरदुर पर्यंत जावे लागायचे, विद्यार्थ्यांची गैरसोय व्हायची याचा विचार करुन प्रभागातील लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून महापालिकेने या ठिकाणी बांधलेल्या शाळेमुळे याभागातील मुलामुलींची शिक्षणाची सोय सुलभ होणार आहे. तसेत वेळेचीही बचत होणार आहे” असे महापौर ढोरे म्हणाल्या. शाळेकरीता जागा देणारे बबन मोरे, संदेश मोरे आणि सुभाष मोरे यांचा सन्मान करुन त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.