Kudalwadi News: प्रेस मशीनचे चाक अंगावर पडल्याने कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय प्रेस मशीनची सर्व्हिसिंग करत असलेल्या कामगाराच्या अंगावर प्रेस मशीनचे चाक पडले. त्यात कामगाराचा चेंदामेंदा झाल्याने मृत्यू झाला. हे घटना 5 डिसेंबर रोजी रात्री घडली असून याबाबत 31 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेश गंगाराम कोरी (वय 30, रा. कुदळवाडी, चिखली) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत मुकेश गंगाराम कोरी (वय 20, रा. कुदळवाडी, चिखली. मूळ रा. नेपाळ) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सतीश चिंतामण भेंडे (रा. पूर्णानगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत राजेश कोरी यांनी प्रेस मशीनच्या सर्व्हिसिंगचे कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण घेतलेले नव्हते. ही बाब माहिती असूनही आरोपीने त्यांना प्रेस मशीनची सर्व्हिसिंग करायला लावले. सर्व्हिसिंग करत असताना मशीनचे चाक राजेश यांच्या अंगावर पडले. त्यात राजेश यांच्या डोके आणि तोंडाचा चेंदामेंदा झाला. पाय तुटला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सतीश याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.