Talegaon Dabhade: कामगारांचे खटले जलद गती न्यायालयात चालविण्याबाबत लवकरच निर्णय – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज – कामगारांची पिळवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात येत असून कामगारांचे खटले जलद गती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) चालविण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठकीनंतर निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा कामगार राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी केली.

वैशाली मंगल कार्यालयात सोमवार (दि.१२) सायंकाळी ५ वा. आयोजित शिवक्रांती कामगार संघटनेच्या कामगार मेळाव्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णराव भेगडे होते. याप्रसंगी शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस अॅड विजय पाळेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे तसेच रवींद्र साठे, गुलाब मराठे, राजेंद्र पवार, वीरेंद्र गायकवाड, ज्ञानेश्वर शिंदे, विरेन पारेख, रोहन आहेर, हनुमंत कलाटे, अविनाश धामणकर, गणेश सुतार, विक्रम गव्हाळे, दिलीप नखाते, विविध कंपन्यांचे व्यवस्थापक व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भेगडे म्हणाले की, कामगार हित जोपासणाऱ्या संघटना लोप पावत चालल्या आहेत.कामगारांचे हित जोपासणाऱ्या कामगार संघटनाच कायम राहतील. स्वार्थासाठी कामगार संघटना मोडीत काढणाऱ्या कामगार नेत्यांना कामगार कधी माफ करणार नाही.
साडेचार वर्षात राज्याचे कामगार कल्याण मंडळ अस्तित्वात नव्हते एक महिन्यात कामगार कल्याण मंडळाचे कार्यालय सुरु केले आहे, असे भेगडे यांनी सांगितले. किमान वेतन कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 व्हेलवेट, एल अँड टी व फिनोलेक्स उर्से कंपनीची शुक्रवारी (दि.१६) बैठक घेऊन कामगारांचा प्रश्न सोडविण्यात येईल, असे भेगडे यांनी सांगितले. औद्योगिक क्षेत्रात स्थानिकांना सर्वाधिक रोजगार उपलब्ध होण्याबाबत तरतूद करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
अॅड. विजय पाळेकर म्हणाले की,  किमान वेतनाच्या कायद्यात दुरुस्ती करून किमान वेतनाच्या रकमेत वाढ करावी. कामगारांच्या निलंबनाची प्रकरणे जलदगती न्यायालयात चालविण्याची व्यवस्था करावी. कामगार हिताचे कायदे होणे काळाची  गरज आहे. कामगारांच्या पाठीमागे राहील तोच आमचा पक्ष आहे. कामगार आयुक्तालयाला मर्यादित अधिकार असल्याने कामगारांना न्याय मिळत नाही. कामगार कायद्याची न्याय प्रक्रिया ही संथ गतीने चालते. स्थानिकांना प्राधान्य द्यावे. स्थानिकांना औद्योगिक क्षेत्रात सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी संस्था उभाराव्यात.
काही नेते स्वतः ला कामगार नेते म्हणवून मिरवले, आणि स्वार्थ साधून मोठे झाले अन कामगारांना ते सोयीस्करपणे विसरले, अशी खंत पाळेकर यांनी व्यक्त केली. मला कामगारांना विसरायचं नाही; म्हणून मी राजकीय क्षेत्रात जाऊ इच्छित नाही. कामगार चळवळ संपत चाललेली आहे. कामगारांसाठी शेवटपर्यंत लढणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
इना बेअरिंगचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर शिंदे, बेन्टलर व्यवस्थापक वीरेंद्र गायकवाड, एसीजी ग्रुपचे उन्मेष पाटील, रवींद्र साठे, श्रीकांत खांबे आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहन आहेर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. महादेव वाघमारे यांनी केले.
 या कार्यक्रमात सत्कार रद्द करून शिवक्रांती कामगार संघटनेच्या वतीने सांगली-कोल्हापूर पूरग्रस्तांना भरघोस मदत देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.