Pimpri : परप्रांतीय गावी जाण्यासाठी करताहेत शेकडो किलोमीटरची पायपीट

एमपीसी न्यूज – संचार बंदीमुळे सर्व जिल्ह्यांच्या आणि सर्व राज्यांच्या सीमा सील केल्या आहेत. त्यामुळे परराज्यातून मजुरी करण्यासाठी किंवा कामानिमित्त शहरात आलेल्या कामगारांना सार्वजनिक वाहतूक बंद झाल्यामुळे आपल्या जिल्ह्यात व राज्यात जाणे अवघड झाले आहे. रोजगार बंद झाल्यामुळे दोन वेळच्या जेवणाची आणि राहण्याची गैरसोय होत असल्यामुळे परप्रांतीय कामगारांनी शेकडो किलोमीटर पायी चालत गावाकडे जाण्याचा पर्याय निवडला आहे. 
देशात 21 दिवसांचा लाॅकडाऊन लागू केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारानिमित्त  शहरात आलेले कामगार, मजूर हे आहे त्याच ठिकाणी अडकून पडले आहेत. अत्यावश्यक सोडून सर्व सार्वजनिक वाहतूक बंद करण्याचे आदेश दिल्याने तसेच सर्व जिल्ह्यांच्या व राज्यांच्या सीमा बंद केल्याने कोणत्याही प्रकारचे स्थलांतर करण्यास बंदी आहे. पण 21 दिवस हाताला रोजगार मिळणार नसल्याने दोन वेळच्या जेवणाची व राहण्याची सोय शहरात होत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगार आपल्या गावा पर्यंत पायी प्रवास करत आहेत.
उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश व इतर राज्यातील कामगार आपल्या गावापर्यंत शेकडो किलोमीटर चा प्रवास पायी चालत करत आहेत. आठ ते दहा लोक एकत्र येऊन खिशात मोजके पैसे घेऊन हा लांबचा पल्ला गाठायचा प्रयत्न करत आहेत. हातावरचे पोट असल्याने एवढ्या दिवस रोजगारा शिवाय राहून जेवणाची गैरसोय होत आहे.  प्रवासात पाणी, जेवण तसेच कोणत्याही प्रकारचा संपर्क करण्याचे साधन उपलब्ध नसल्याने या कामगारांसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. मेरठ, गोरखपुर, भोपाळ, रतलाम, भिलवाडा पर्यंतचा असुरक्षित आणि जोखमीचा प्रवास हे कामगार करत आहेत.
मी ज्या कंपनीमध्ये काम करत होतो त्या कंपनीचा मालक कंपनी बंद करून गावाला निघून गेला. आम्ही एका खोलीत आठ जण राहतो त्यामुळे सुरक्षेचा तर प्रश्न आहेच पण फक्त दोन दिवसाचे राशन शिल्लक असल्याने व खिशात पैसे नसल्याने आम्ही चालत गावाला जाण्याचा निर्णय घेतला. माझी पत्नी गरोदर आहे आणि घरी आई एकटीच असल्यामुळे जास्त चिंता वाटत आहे.    – आतिश शर्मा,  राजस्थान
(पोलिसांनी गावी जाताना अडवल्यामुळे सध्या हिंजवडी आयटी पार्क येथे अडकून पडलेल्या आठ कामगारा पैकी एक)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.