Pimpri News: खाटांची कमतरता; ‘व्हेटिंलेटर’च्या केवळ तीन खाटा शिल्लक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने खाटांची कमतरता भासत आहे. महापालिकेची रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. वाढत्या रुग्णांमध्ये गंभीर, अतिगंभीर रुग्णांचेही प्रमाण जास्त आहे.

या रुग्णांना आवश्यक असलेल्या ‘व्हेटिंलेटर’च्या खाटांची मोठी टंचाई आहे. आजमितीला ‘व्हेटिंलेटर’च्या केवळ तीन खाटा शिल्लक आहेत. रात्री, अपरात्री व्हेटिंलेटर खाटेची गरज पडल्यास खाट देणे अवघड होणार आहे. त्यामुळे परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे.

शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत  झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णवाढीचा दररोज नवीन उच्चांक होत आहे. रुग्णालयात दाखल होणा-यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यात गंभीर, अतिगंभीर रुग्णांचीही संख्या अधिक आहे. परिणामी, गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या व्हेटिंलेटर खाटांची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे.

महापालिकेच्या वायसीएम, भोसरी, जिजामाता, अॅटो क्‍लस्टर या रुग्णालयांमध्ये गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर आणि बालनगरी, घरकुल येथील कोविड केअर सेंटरमध्ये लक्षणेविरहित रुग्णांवर उपचार केले जातात.

कोरोनाबाधित रुग्णांसाठी 4 हजार 670 खाटा उपलब्ध आहेत. त्यातील 755 खाटा शिल्लक आहेत. ऑक्सीजन नसलेल्या 2 हजार 287 खाटा असून त्यातील 169 खाटा शिल्लक आहेत. ऑक्सीजनयुक्त 1 हजार 677 खाटा आहेत. त्यातील 318 खाटा शिल्लक आहेत.

व्हेटिंलेटर नसलेल्या आयसीयूच्या 477 खाटा असून त्यातील 257 खाटा शिल्लक आहेत. तर, आयसीयू व्हेटिंलेटर असलेल्या एकूण 229 खाटा आहेत. त्यातील केवळ तीन खाटा आता उपलब्ध आहेत.  ‘व्हेटिंलेटर’च्या खाटांची मोठी कमतरता आहे. अतिगंभीर रुग्ण असल्यास त्याला ‘व्हेटिंलेटर’ची खाट मिळणे मुश्किल होणार आहे. त्यामुळे शहरातील परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे.

महापालिकेच्या डॅशबोर्डनुसार शहरात 163 गंभीर रुग्ण आहेत. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. तर, 168 रुग्णांना ‘व्हेंटिलेटर’वर ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

याबाबत बोलताना आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय म्हणाले, ”सद्यस्थितीत व्हेटिंलेटरच्या तीनच खाटा उपलब्ध आहेत. रात्री, अपरात्री व्हेटिंलेटर खाटेची गरज पडल्यास खाट देणे अवघड होणार आहे. पुढील तीन ते चार दिवसात व्हेटिंलेटरच्या खाटा वाढल्या नाही. तर, परिस्थिती आणखी गंभीर होईल”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.