Pune : लाडशाखीय वाणी समाजाच्या दोन दिवसीय महाअधिवेशनाचा समारोप

सामारोपास राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि केंद्रिय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांची  उपस्थिती   

एमपीसी न्यूज – पुण्याजवळील मारुंजी येथील लाडशाखीय वाणी समाजाच्या महाअधिवेशनाचा समारोप राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि केंद्रिय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या विशेष उपस्थितीत पार पडला.या दोन दिवसीय अधिवेशनात स्वत:च्या विकासाबरोबरच समाजाचा विकास कशा पद्धतीने करता येईल यावर अनेक मान्यवरांच्या मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन देखील करण्यात आले होते. महाअधिवेशनाचे अध्यक्ष कैलाश वाणी, खजिनदार श्यामकांत शेंडे, सहकार्याध्यक्ष अनिल चितोडकर, संयोजन समितीचे सदस्य श्यामकांत कोतकर, निलेश पुरकर हेही यावेळी उपस्थित होते.    

या महाअधिवेशनाच्या समारोप सत्रात बोलताना सुभाष भामरे यांनी लाडशाखीय वाणी समाजाच्या उद्योजकतेचे कौतुक केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून छोट्या उद्योजकांना घडविण्यावर भर देण्याला सुरुवात केली आहे. मात्र मला अभिमानाने सांगावेसे वाटते की, लाडशाखीय वाणी समाजाने या पद्धतीचा अवलंब गेल्या कित्येक वर्षांपूर्वी केला असून विविध स्तरावर उद्योजक घडविले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

यानंतर महाअधिवेशनाचे कार्याध्यक्ष कैलाश वाणी यांनी समाजाची संख्या कमी असल्याने राजकीय प्रतिनिधित्व नसल्याची खंत व्यक्त केली यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, राजकारणात येण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी पैसा किंवा आपल्या समाजाची संख्या या दोनच गोष्टी महत्त्वाच्या असतात असे नाही. त्यासाठी लागते ती प्रामाणिकपणे समाजकार्य करण्याची जिद्द. त्यावर ते पुढे म्हणाले की, माझेच उदाहरण घेतले तर माझ्या मतदार संघात माझ्या समाजाची मतदार संख्या केवळ 2500 असून देखील मी पाच वेळा आमदार झालो. दरवेळी माझे मताधिक्य वाढतच गेले. त्यामुळे पैसा आणि आपल्या समाजातील मतदारांची संख्या या जोरावरच निवडणूक जिंकता येते असे नाही. मी चार ते साडे चार लाख लोकांना केलेली वैद्यकीय मदत लक्षात घेत मतदारांनी कायमच त्यांचा आशीर्वाद जातीपातीच्या भिंती ओलांडून मला दिला आणि तो आजवर कायम ठेवला. आज मी जलसंपदा खात्याचा मंत्री झालो पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेलो मी कायमच राष्ट्र प्रथम या भावनेने काम करीत असल्याने माझ्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाचे शिंतोडे कधीही उडणार नाही, असे त्यांनी ठासून सांगितले. तुमच्या समाजाचे निस्वार्थीपणे समाजकार्य  करणाची भावना असणारे चार तरुण मला द्या, त्यांनां योग्य पद्धतीने प्रशिक्षण देऊन राजकारणात उतरण्यासाठी सक्षम बनवेल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

याबरोबरच आगामी धुळे निवडणुकीत प्रचार करायचा असेल तर तिथे घरोघरी जाण्याची गरजच नाही कारण तिथला सर्वाधिक लाडशाखीय वाणी समाज या महाअधिवेशनाच्या निमित्ताने याच ठिकाणी एकत्र आला आहे, अशी कोपरखळी त्यांनी यावेळी मारली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1