Chinchwad News : घरफोडीच्या तपासात पोलीस निष्काळजीपणा करत असल्याचा आरोप, न्यायालयात दाद मागण्याचा इशारा

 

एमपीसी न्यूज – चिंचवड स्टेशन येथे झालेल्या घरफोडीच्या तपासात पोलीस निष्काळजीपणा करत असल्याचा आरोप घराचे मालक लखपतराज मेहता यांनी केला आहे. घरफोडी झाली त्यादिवशी या गुन्ह्यातील आरोपी त्याच ठिकाणी सापडून देखील अजून कारवाई झाली नाही तसेच, पोलिसांकडून गुन्ह्याच्या तपासाबाबत काहीच माहिती दिली जात नाही. पोलीस सहकार्य करत नसल्याने आता न्यायालयात दाद मागण्यावाचून पर्याय नसल्याचे मेहता यांनी म्हटले आहे. 

लखपतराज मेहता यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना ई-मेलद्वारे पाठविलेल्या पत्रात असे म्हटले आहे की,  28 जानेवारीला त्यांच्या चिंचवड स्टेशन येथील घरी घरफोडी झाल्याचे उघडकीस आले. घरातून सोन्या- चांदीचे दागिने, भांडी, कॉम्पुटर, लॅपटॉप, वस्तू, कपडे व इतर साहित्य चोरीला गेले. या गुन्ह्यातील आरोपी त्याचवेळी घरात सापडले. तरीही पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला नाही. काही दिवसांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी प्रसिद्धिमाध्यमांना चुकीची माहिती दिली तसेच, या गुन्ह्याच्या तपासाबाबत कोणतीही माहिती पोलीस देत नसल्याचा आरोप मेहता यांनी केला आहे.

मेहता यांनी पुढे म्हटले आहे की, घरफोडीत आमचे अधिक नुकसान झाले आहे. आम्हाला पोलिसांकडून न्यायाची अपेक्षा होती, मात्र ते दाखवत असलेल्या निष्काळजीपणामुळे तपासाबाबत शंका उपस्थित होते. एवढेच काय त्यांनी आरोपींना सोडून दिल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. प्रथमदर्शी पुराव्यानुसार पोलिसांनी योग्य कारवाई आणि तपास करणं गरजेचे आहे. पण, तसे होताना दिसत नाही. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात असल्याचे जाणवते. खुद्द पोलिसांनीच पाहिलेल्या प्रथमदर्शी पुराव्यानुसार पोलिसांनी सहकार्य करावे अन्यथा न्यायालयात दाद मागण्याशिवाय पर्याय नसल्याचे मेहता म्हणाले.

दरम्यान, पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मिलिंद वाघमारे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, याप्रकरणी योग्य दखल घेण्यात आली असून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. जसजसा तपास पुढे जाईल तशी माहिती दिली जाईल, असे वाघमारे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.