Vadgaon Maval : एमआयडीसी टप्पा क्रमांक चारमध्ये गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळणार गावातच; आमदार सुनील शेळके यांची माहिती

एमपीसी न्यूज – तळेगाव एमआयडीसी टप्पा क्रमांक चार आंबळे, निगडे, कल्हाट व पवळेवाडी येथील शेतक-यांच्या जमिनीवर एमआयडीसीचे शिक्के पडले आहेत. ज्या गावात एमआयडीसीचे अधिकारी भूसंपादन प्रक्रिया करतील तेथील शेतकऱ्यांच्या बाजू ऐकून घेतील आणि पेमेंट सुद्धा त्या ठिकाणी करतील, अशी माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.

तळेगाव एमआयडीसी टप्पा क्रमांक 4 मधील भूसंपादन झालेल्या आंबळे गावातील जमिनींच्या मोबदल्याचे पेमेंट एमआयडीसीचे अधिकारी हे आंबळे गावातच जाऊन करणार आहेत तसेच निगडे, कल्हाट व पवळेवाडी येथील इको सेन्सेटिव्ह झोनमुळे रखडलेली भूसंपादन प्रक्रिया पूर्ण व्हावी यासाठी इको सेन्सेटिव्ह झोन काढण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी तयार करून केंद्र सरकारकडे पाठविला असून लवकरात लवकर त्यावर संमती आणणार असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.

दरम्यान, ज्या शेतकऱ्यांना जमिनी द्यायच्या नाहीत, त्या शेतकऱ्यांच्या जमिनी वगळण्यात येणार आहेत. परंतु अशा जमिनी एमआयडीसी क्षेत्रात येत असतील तर त्या बदल्यात संबंधित शेतकऱ्यांना एमआयडीसी क्षेत्राबाहेर जमीन काढून दिली जाणार आहे. याशिवाय एमआयडीसीत समाविष्ट होणाऱ्या गावांच्या विकासासाठी प्रत्येक गावासाठी 25 एकर जागा शाळा, दवाखाना, क्रीडांगण आदी सोयी सुविधांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.

…तर चेकपोस्टवरच होणार लसीकरण

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मावळवासीयांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे, लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले. तसेच, अजूनही 44 हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. तालुक्यात काही ठिकाणी चेकपोस्ट करून आरोग्य व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांची पडताळणी करून पहिला किंवा दुसरा डोस घेतला नसेल तर लसीकरण झाल्याचे सर्टिफिकेट तपासले जाणार आहे.

जर सर्टिफिकेट मिळाले नाही तर त्याच ठिकाणी लसीकरण केले जाणार आहे. यासाठी प्रत्येक चेकपोस्ट नाक्यावर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती शेळके यांनी दिली तसेच या लसीकरण कामी नागरिकांनी प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन आमदार शेळके यांनी केले असून बुस्टरडोसची सुरूवातही येत्या सोमवारपासून करण्यात येणार असल्याचे शेळके म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.