Vadgaon Maval : भू माफिया आणि सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी केला बदनामीचा कट – सहाय्यक निबंध विठ्ठल सूर्यवंशी यांचे स्पष्टीकरण; भाजपच्या आंदोलनाच्या पवित्र्यावर

एमपीसी न्यूज – मावळ भाजपने मावळचे सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत त्यांची बदली व्हावी अशी मागणी केली. तसेच सहाय्यक निबंधक सूर्यवंशी यांनी अनेक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला. यावर सूर्यवंशी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मावळ तालुक्यातील भूमाफिया आणि सहकार विभागातील काही अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक ठरवून आपल्या बदनामीचा मोठा कट रचला असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच आपण नियमाप्रमाणे काम करत असून यामुळे काही जणांची गैरसोय होत असल्याने हा प्रकार होत असल्याचेही सूर्यवंशी म्हणाले.

मावळ तालुका भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या बाबतीत केलेले जे आरोप आहेत त्याबाबतची वस्तुस्थिती अशी आहे की, गाव पातळीवरील शेती विकास संस्थांच्या बाबतीत दहा गुंठे जमीन नसणाऱ्या लोकांना संस्थेचे सभासद होता येत नाही. मृत व्यक्तींना संस्थेचे सभासद राहता येत नाही. मावळ तालुक्यातील 14, हजार अपात्र व्यक्तींची नावे मतदार यादीतून रीतसर कमी केलेली आहेत.महाराष्ट्रातील ते पथदर्शक काम आहे.याबाबत कोणाचा आक्षेप असल्यास सक्षम प्राधिकरणाकडे संबंधितांनी दाद मागवायची होती.तक्रारीला काही अर्थ नाही. शेती विकास संस्थांच्या निवडणुका या जिल्हा उपनिबंधक यांच्यामार्फत घेतल्या जातात. या संस्थांची निवडणुकीची मतदार यादी बनविण्यामध्ये सहाय्यक निबंधकांचा कुठलाही सहभाग नसतो. जिल्हा उपनिबंधक यांनी घेतलेल्या निर्णयाला ज्यांचा आक्षेप असेल त्यांनी रीतसर न्यायालयात अपील करण्याचे अपेक्षित आहे. असे म्हटले आहे.

मावळ तालुक्यातील कोणत्याही शेती विकास संस्थेची निवडणूक मी घेतलेली नाही. त्यामुळे कोणाच्याही डिपॉझिटशी माझा काहीही संबंध नाही. मजूर संस्था या खऱ्या मजुरांसाठी असतात. बोगस मजुरांसाठी नाही. बोगस मजूर असल्याचे तक्रारी आल्यामुळे व या संस्थांचे कामकाज बंद असल्याने त्या संस्था रीतसर अवसायनात घेऊन तसे आदेश पारित केलेले आहेत.  माननीय वरिष्ठांच्या सूचनेनुसार त्या संस्थांची नोंदणी रद्दची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

संस्था बंद असताना तिला कोणत्याही कारणास्तव ब वर्ग देता येत नाही. निवडणुकीसाठी जर कोणी चुकीचा ब वर्ग दाखवून प्रशासनाची दिशाभूल करत असेल तर निबंधक म्हणून त्यात हस्तक्षेप करण्याचा सहाय्यक निबंधकांना पूर्ण अधिकार आहे.माननीय न्यायालयाने सुद्धा त्यावर शिक्कामोर्तब केलेले आहे. कोणत्याही संस्थेवर प्रशासक नेमताना कोणास नेमावयाचे हा निबंधकाचा अधिकार असतो. त्या त्या परिस्थितीत त्याच्या मानधनाचा निर्णय हा निबंधक घेत असतात. संबंधित संस्था सोडून अन्य व्यक्तींचा तेथे काहीही संबंध नसतो. माझी  बदली चुकीच्या पद्धतीने झालेली होती. म्हणून माननीय न्यायालयाने ती स्थगित करून माननीय न्यायालयाच्या आदेशाने मी काम करत आहे.मावळ तालुक्यात पोस्टिंग करण्यासाठी सहकार खात्यातील अनेक अधिकारी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. हे असंतुष्ट आत्मे आमच्या बाबत स्थानिक सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना चुकीच्या गोष्टी सांगून त्यांची दिशाभूल करत आहेत.

विकास संस्थांच्या बाबतीत मावळ तालुक्यात मी महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कामकाज केलेले आहे. मावळ तालुक्या प्रमाणे राज्यातील इतर तालुक्यातील सुद्धा विकास संस्थांचे बोगस सभासद कमी करावेत याबाबत तत्कालीन लोकप्रतिनिधी माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी शासनाकडे रीतसर विनंती केलेली होती. याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. सहकार विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेचा मी रीतसर अध्यक्ष आहे. सहकार खात्यातील जे अधिकारी पडद्यामागून या संपूर्ण प्रकरणाचे मास्टरमाईंड आहेत त्यांनी कधीही आमच्या समोर येऊन चर्चा करावी असेही सुर्यवंशी यांनी सांगितले.

श्री रवींद्र भेगडे यांना आम्ही सविस्तर पत्र दिलेले आहे. ते पत्र त्यांनी तालुक्याच्या निदर्शनास आणावे. मोघम स्वरूपाचे आरोप करून त्यांच्या म्हणण्या प्रमाणे नाही झाल्यास कार्यालय बंद करणे ही पूर्णतः चुकीची बाब आहे. हा संपूर्ण धमकीचा प्रकार आहे. यात कुठलेही तथ्य नाही. याबाबत मी शासनास रीतसर अहवाल देत आहे. मावळ तालुक्यात करोडो रुपयांचा गैरव्यवहार झाल्या प्रकरणी मी भूमाफियांविरोधात रीतसर गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामध्ये अनेकांची हितसंबंध गुंतलेले आहेत भूमाफिया आणि सहकारातील काही अधिकारी यांनी जाणीवपूर्वक ठरवून बदनामीचा हा एक मोठा कट केलेला  आहे. ज्यांना कोणाला काही शंका असतील त्यांनी कधीही माझ्याकडे चर्चेस येऊन त्यांच्या शंकांचे निरसन करून घ्यावे. बदनामी आणि अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये.या संपूर्ण कटाचे मास्टरमाईंड वेगळे आहेत असेही सुर्यवंशी  यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.