Pimpri : कोरोनाच्या दहशतीने गाव गाठलेल्यांची शेतात राखणीला रवानगी

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या दहशतीने पुणे-मुंबई या शहरातून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गाव गाठले आहे. शहरातून आल्यामुळे गावातील मंडळींनी देखील त्यांच्यापासून थोडे अंतरच ठेवले आहे. त्यामुळे गाव गाठलेल्यांची रवानगी आंबे, केळी, फणस, द्राक्षाच्या बागेत राखणीला रवानगी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी गहू, हरभरा काढणीची कामे सुरू असून त्यासाठी देखील ही मंडळी हातभार लावत आहे. खबरदारी म्हणून गाववाल्यांनी शहरवासीयांपासून काही दिवसांसाठी अंतर राखायचे ठरवले आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला कोरोना विषाणू भारतात दाखल झाला. शहरात कामाच्या, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने गेलेल्या अनेकांनी कोरोनाच्या धसक्याने तसेच खबरदारी म्हणून गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. एसटी बस, खासगी बस, कार, दुचाकी, रेल्वे अशा मिळेल त्या मार्गाने लोकांनी गावाकडे धाव घेतली. त्यातल्या अनेकांनी मागील काही महिने, वर्षांपासून गावाचा रस्ता सोडला होता. दिवाळी, गावातील यात्रा, सण, समारंभाला देखील अनेकजण कामाच्या व्यापाचे कारण देऊन गावाला जाण्याचे टाळत होते. अशी मंडळी देखील कोरोना विषाणूने गावाकडे पिटाळली.

शहरातून गावात दाखल झालेल्यांची पोलीस पाटील आणि ग्रामपंचायतीने नोंद करून त्यांची आरोग्य तपासणी केली. कोरोनाची लक्षणे नसल्याची खात्री झाल्यानंतर त्यांना किमान 14 दिवस वेगळं राहायला सांगण्यात आले. गावातल्या मंडळींनी सुद्धा त्याचे पालन करायचे ठरवले आणि या शहरवासीयांची ड्युटी शेतात पिकांच्या राखणीच्या कामाला लावली. सध्या गहू, हरभरा असे काढणीचे दिवस आहेत. सर्वत्र काढणीची कामे सुरू झाली आहेत. या कामात देखील त्यांची मदत होत आहे. ज्यांना कामाची सवय नाही, अवजारे घेऊन काम करू न शकणारे आंबा, केळी, फणस, द्राक्षाच्या बागेत राखणीला पाठवण्यात आले आहे.

शेतात राखणीला गेलेले या बांधावरून त्या बांधावर चक्कर मारणे, या झाडाखालून त्या झाडाखाली पडी मारणे, एखाद्या झाडावरील मधाचं पोळं काढणं, पोहायची हुक्की आली तर विहिरीत मस्त डुबकी मारून तासंतास पोहत बसणं असे उद्योग ही मंडळी करीत आहेत.  तसेच काहीजण ‘वर्क फ्रॉम गाव’सुद्धा करीत आहेत. ‘किती गुणाचं लेकरू गं, एवढी मोठी महामारी आली, सगळा देश बंद पडला. पण माझ्या लेकराचं काम बंद नाही झालं’ असं म्हणून आईलोक आपल्या काम करणाऱ्या लेकरांचं कौतुकही करीत आहेत.

शहराच्या नवलाईत, भपकेबाज जगण्यावर मोहित झालेल्या अनेक महिला शहरातून गावात जाणं म्हणजे वेगळ्याच ग्रहावर जाण्यासारखं समजतात. अशा महिलांनाही नाईलाजाने गाव गाठावे लागले आहे. मग काय, गावाकडच्या महिला सुद्धा कमी नाहीत. त्यांनीही लगेच उन्हाळी सामान करण्याचा घाट घातला. कुरडया, पापड्या, पापड, लोणची, शेवया, चिप्स असे वर्षभरासाठी लागणारे सामान घरोघरी बनवायला घेतले आहे. शहरात राहणाऱ्यांना वर्षभर लागणारे कुरडया, पापड्या, लोणची गावाकडून वेळच्या वेळी पोहोच केली जातात. मात्र, त्यामागे किती मेहनत असते, याची प्रत्यक्ष प्रचिती या कोरोनामुळे महिलांना येत आहे. आपल्याला दरवर्षी गावाकडून हे पदार्थ पोहोच होत असल्याने महिला सुद्धा नाक मुरडून का होईना काम करत आहेत.

केवळ नकारात्मकच बोलून चालणार नाही. काहींच्या घरी शहरातून गेलेली सून, मुलगी, बहीण घरातलं सगळं काम करतात. शहरातल्या धकाधकीतून गावाकडच्या मोकळ्या वातावरणात जायला मिळाल्याने त्यांनाही आनंद झाला आहे. गावात यात्रा, दिवाळी, सण, उत्सव असं काहीही नसताना गाव अगदी भरून गेलं आहे. आपली माणसं साथीच्या भीतीने का होईना गावाकडं आलीत हेच त्यांच्यासाठी खूप आहे.

तर काही गावात या शहरातल्या लोकांना एन्ट्री पण दिली नाही. गावाच्या बाहेर एक शेड बनवून त्यात त्यांची राहण्याची चोख व्यवस्था केली आहे. त्यांना दररोज वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी जागेवर पोहोच केल्या जात आहेत. अगदी अंघोळीच्या पाण्यापासून ते जेवण, गादीसह अंथरूण, पांघरून सुद्धा पोहोचवलं जात आहे. ‘तुम्ही या मखमली गादीवर झोपा पण काही दिवस गावात फिरकू नका’ असं काहीसं काळजीपोटी शहरातून गेलेल्यांना सांगितलं जातंय. शहरातील धोक्यापेक्षा सुरक्षित असलेल्या गावाच्या बाहेर मुक्काम असला तरी ‘गड्या आपला गावच बरा’ असं म्हणून ही मंडळी मनाची समजूत घालत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.