Last Rights of Ram Vilas Paswan: वडिलांच्या चितेला अग्नी देताना चिराग पासवान पडले बेशुद्ध 

एमपीसी न्यूज – केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यावर पाटणा येथील जनार्दन घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी मुलगा चिराग पासवान यांनी वडिलांच्या पार्थिवाला अग्नी दिला. वडिलांवर अग्नी संस्कार करताना चिराग बेशुद्ध होऊन खाली पडले.

पाटण्यातील गंगा घाटावर अंत्यविधीच्या वेळी दुःखावेग अनावर झालेले चिराग कधी स्वतःला सावरताना तर कधी आईचे अश्रू पुसताना दिसत होते. चिराग यांना वडिलांना मुखाग्नी देताच ते बेशुद्ध होऊन खाली पडले. यावेळी चिराग यांच्या चुलत भाऊ व उपस्थितांनी त्यांना सावरण्यास मदत केली.

रामविलास पासवान यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, मुख्यमंत्री नितीशकुमार, उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, केंद्रीय मंत्री नित्यानंद राय, केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे, तेजस्वी यादव, मंत्री मंगल पांडे, खासदार रामकृपाल  यादव, महेश्वर हजारी यांच्यासह सर्वच पक्षांचे नेते उपस्थित होते.

गंगा घाटावर अंतिम संस्कार होण्यापूर्वी उपस्थित नेत्यांनी रामविलास पासवान यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर रामविलास पासवान यांच्यावर राष्ट्रीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैन्याच्या जवानांनी अखेरची मानवंदना दिली.

बिहारच्या राजकारणातील प्रख्यात चेहरा असलेल्या आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी हजारो लोक सकाळपासूनच जनार्दन घाटावर पोहोचले होते. गर्दी नियंत्रित करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बॅरिकेडिंग करण्यात आले होते, परंतु लोकांना जवळून आपल्या दिवंगत नेत्याचे अंतिम दर्शन घ्यायचे असल्याने शेवटी लोकांनी बॅरिकेडिंग तोडले. मात्र घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी जमावाला नियंत्रित केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.