रविवार, सप्टेंबर 25, 2022

Dapodi : ड्रेनेज लाईनच्या खड्ड्यात मातीच्या ढिगा-यात सहाजण अडकले; बचाव कार्य करताना अग्निशमन दलाच्या एका जवानाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अमृत योजनेअंतर्गत सुरु असलेल्या ड्रेनेजच्या खड्ड्यात सहा जण अडकले. ही घटना रविवारी (दि. 1) सायंकाळी सहाच्या सुमारास गणेश नगर दापोडी येथे घडली. पाच जणांना बाहेर काढण्यात आले असून एका कामगाराचा शोध सुरु आहे. बाहेर काढलेल्या चार जणांची प्रकृती स्थिर असून अग्निशमन विभागाचा एक कर्मचारी मृत्यूमुखी पडला.
विशाल हणमंतराव जाधव (वय 32, रा. मोशी. मूळ रा. सातारा), असे शहीद झालेल्या अग्निशमन विभागाच्या जवानाचे नाव आहे. अग्निशमन विभागाचे निखिल गोगावले, सरोज फुंडे, नागरिक सीताराम कैलास सुरवसे (वय 20), ईश्वर सूर्यकांत बडगे (वय 19), अशी बाहेर काढलेल्यांची नावे आहेत. कामगार नागेश कल्याणी जमादार (वय 22) याला बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. अग्निशमन विभागाचे अडकलेले सर्व जवान डिसेंबर 2012 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागात दाखल झाले होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अमृत योजनेअंतर्गत दापोडी येथील पाण्याच्या टाकीजवळ मागील दोन दिवसांपासून ड्रेनेजचे काम सुरु आहे. नागेश जमादार हा कामगार ते काम घेतलेल्या ठेकेदाराकडे काम करत होता. त्याला रविवारी सुट्टी होती. तरीही एका दिवसाचा 700 रुपये पगार देण्याचे सांगून त्याला कामावर आणले. सायंकाळी सहाच्या दरम्यान तो ड्रेनेजच्या खड्ड्यात काम करत असताना अचानक वरून खड्ड्यात माती पडली आणि त्यात तो गाडला गेला. त्याला वाचविण्यासाठी सीताराम सुरवसे आणि ईश्वर बडगे हे दोघेजण गेले. त्याला बाहेर काढत असताना आणखी माती पडली आणि तिघेजण गाडले गेले.
याबाबत अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाच्या मुख्य केंद्राचे कैलास वाघेरे, दिलीप गायकवाड, निखिल गोगावले, सरोज फुंडे, मुकेश बर्वे आणि विशाज जाधव या सहा जणांना घेऊन वाहनचालक गवारी यांचे पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. विशाल जाधव, निखिल गोगावले, सरोज फुंडे हे जवान अडकलेल्या तिघांना वाचविण्यासाठी खड्ड्यात उतरले. जवानांनी सीताराम आणि ईश्वर या दोघांना सुखरूप बाहेर काढले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जमादार यांची माहिती एक नागरिक अग्निशामक दलाच्या जवानांना देत होता. त्यांना बाहेर काढत असताना बघ्यांची गर्दी झाली. त्यामुळे वरच्या ढिगा-यातून आणखी माती खाली ढासळली आणि नागेश आणि अग्निशमन विभागाचे तीन कर्मचारी पुन्हा गाडले गेले.
त्यापैकी फुंडे आणि गोगावले हे तोंडापर्यंत दबले गेले. त्यामुळे त्यांना श्‍वास घेता येत होता. तर विशाल यांच्या मानेवर मोठा दगड पडून मातीचा ढिगारा अंगावर पडला. अग्निशमन विभागाच्या तीन जवनांसह चारजण पुन्हा अडकले. याबाबतची माहिती वाहन चालक गवारी यांनी अग्निशमन विभागाच्या नियंत्रण कक्षाला दिली. अग्निशामक दलाचे जवान दबल्याची माहिती मिळताच उर्वरित सर्व उपकेंद्राचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचाव कार्यास सुरुवात केली. दोन तासांच्या प्रयत्नानंतर गोगावले व फुंडे यांची सुखरूप सुटका केली. तर अडीच तासाने विशाल जाधव यांना शोधण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अग्निशामक दलाच्या मदतीला एनडीआरएफ आणि लष्कराची एक तुकडी दाखल झाली. तसेच अग्निशमन विभागाच्या पुण्यातील देखील काही पथकांना बोलावण्यात आले. रात्री अग्निशमन विभागासह एनडीआरएफच्या पथकाने शोधकार्य सुरू केले. उशिरापर्यंत जमादार यांचे शोधकार्य सुरू होते.
बचाव पथकांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा
अग्निशमन दलाचे जवान अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील अग्निशमन विभागाच्या सर्व उपकेंद्राची पथके बचाव कार्यासाठी धावली. तसेच त्यांच्या मदतीला एनडीआरएफ आणि लष्कराची एक तुकडी देखील दाखल झाली. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली. बघ्यांची गर्दी मातीच्या ढिगा-यावर चढल्याने हा प्रकार वाढला. त्यामुळे ही गर्दी पांगवण्यासाठी भोसरी पोलिसांनी धाव घेतली. मात्र गर्दी पोलिसांना जुमानत नसल्याचे लक्षात येताच अपर आयुक्त रामनाथ पोकळे यांनी आयुक्तालयातील जवळपासच्या सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी रवाना केले. अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक आयुक्त रामचंद्र जाधव हे वरिष्ठ अधिकारी पूर्णवेळ घटनास्थळी थांबून होते.

spot_img
Latest news
Related news