Pimpri News : प्लास्टिकमुक्त शहर या विशेष मोहिमेला प्रारंभ

एमपीसी न्यूज – पुनर्वापरात न येणा-या तसेच पर्यावरणास हानिकारक ठरणा-या प्लास्टिकचा वापर टाळण्याच्या दृष्टीने आणि पर्यावरणाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करुन लोकसहभाग वाढवण्याकरीता महापालिकेच्या वतीने शहरात प्लास्टिकमुक्त शहर या विशेष मोहिमेला प्रारंभ झाला.

जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने आजपासून सुरु केलेली प्लास्टिक मुक्त शहर ही विशेष मोहीम 5 जून पर्यंत राबविण्यात येणार आहे. प्लास्टिकचे विघटन होत नसल्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. यासाठी शहरात जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत दि.26 मे रोजी शहरात सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत “प्लास्टिक मुक्ती जनजागृती पदयात्रा” काढण्यात येणार आहे.

 

यामध्ये दि.26, 27, 28, 29 मे 2022 रोजी अनुक्रमे अ आणि ब, क आणि ड, ई आणि फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये विविध सामाजिक संस्था, संघटना, नागरिक यांच्या सहभागातून प्लॉगेथॉन मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच 4 जून रोजी सकाळी 8 ते 12 या वेळेत “रिव्हर प्लॉगेथॉन” मोहिम राबविण्यात येणार आहे. यामध्ये पवना नदीमध्ये सांगवडे (किवळे) ते संगम येथे, मुळा नदीमध्ये वाकड ते संगम येथे, इंद्रायणी नदीमध्ये तळवडे ते चऱ्होली येथे “रिव्हर प्लॉगेथॉन” मोहिम पार पडणार आहे.

 

शासनाने बंदी घातलेल्या तसेच एकवेळ वापरासाठी असलेल्या प्लास्टिक पिशवी बंदीबाबत शहरात विविध माध्यमातून नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे. कापडी पिशवीचा वापर करत असल्याचा सेल्फी काढण्याचा उपक्रम महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहे.

शहरात राबविण्यात येणाऱ्या प्लास्टिक मुक्ती मोहिमेत शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, बचत गट, स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण संस्था, अशासकीय संस्था, गणेश मंडळे, क्लब, इतर संघटना, महापालिका अधिकारी व कर्मचारी वर्ग आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.