Pune : मराठमोळ्या ‘कॉपी’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लाँच

एमपीसी न्यूज : मराठी सिनेमांनी कायम दुहेरी यश मिळवत जगभरातील मराठी रसिकांचा आनंद द्विगुणित केला आहे. काही मराठी सिनेमे देशविदेशांतील सिनेमहोत्सवांमध्ये मराठीची पताका उंचावत रसिकांच्या भेटाला येतात, तर काही थेट बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवतात. हीच परंपरा जोपासणारा ‘कॉपी’ हा आगामी मराठी चित्रपट मागील काही दिवसांपासून रसिकांपासून समीक्षकांपर्यंत सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे. 

1 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे भारत आणि परदेशातील सिनेमहोत्सवांमध्ये कौतुकास पात्र ठरलेल्या ‘कॉपी’ सिनेमाचं मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यात आलं आहे.

निर्माते गणेश रामचंद्र पाटील यांनी ‘श्री महालक्ष्मी क्रिएशन्स’च्या बॅनरखाली तयार केलेल्या तसच विवेक पंडित यांच्या ‘वंदे मातरम फिल्म्स’ची प्रस्तुती असलेल्या ‘कॉपी’चं लक्षवेधी मोशन पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिक दरबारी सादर करण्यात आलं आहे. शिक्षण व्यवस्थेवर तसेच शिक्षण क्षेत्रातील कारभारावर दयासागर वानखेडे आणि हेमंत धबडे या दिग्दर्शक द्वयींनी कॉपी चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. रसिकांच्या भेटीला येण्यापूर्वी या चित्रपटानं एशियन फिल्म फेस्टिव्हल, लॉस एंजेलिस सिने फेस्टिव्हल, संस्कृती कलादर्पण चित्रपट महोत्सव आणि 55 व्या महाराष्ट्र राज्य पुरस्कार सोहळ्यात आपलं वर्चस्व गाजवलं आहे.

या चित्रपटात मिलिंद शिंदे, अंशुमन विचारे आणि जगन्नाथ निवंगुणे यांनी खेडयातील शिक्षकांची भूमिका साकारली आहे. यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून दिग्दर्शकानं महाराष्ट्रातील खेडयातील शाळांमध्ये शिकवणा-या शिक्षकांच्या व्यथा आणि कथा सादर करण्याचं काम केलं आहे. त्यामुळेच या चित्रपटातील एका खेडयातील शाळा देशभरातील असंख्य गावांमधील शाळांचं प्रतिनिधीत्त्व करणारी आणि त्यातील शिक्षक त्यांच्या पुढील समस्यांकडे बोट दाखवणारे असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मिलिंद शिंदे, अंशुमन आणि जगन्नाथ यांच्या जोडीला कमलेश सावंत, सुरेश विश्वकर्मा, निता दोंदे, अनिल नगरकर, राहुल बेलापूरकर, आशुतोष वाडकर, पूनम राणे, सौरभ सुतार, प्रवीण कापडे, रवी विरकर, श्रद्धा सावंत, अदनेश मदुशिंगरकर, प्रतिक लाड, रोहित सोनावणे, प्रतीक्षा साबळे, शिवाजी पाटणे, सिकंदर मुलानी, आरती पाठक आणि विद्या भागवत आदी कलाकारांनी या चित्रपटात विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.

‘कॉपी’सारखा विषय रूपेरी पडद्याच्या माध्यमातून जगासमोर मांडण्याची मूळ संकल्पना चित्रपटाचे निर्माते गणेश रामचंद्र पाटील यांची आहे. या संकल्पनेवर दयासागर वानखेडे आणि हेमंत धबडे यांनी राहुल साळवे यांच्या साथीनं कथालेखन केलं असून, पटकथा दिग्दर्शक द्वयींनीच लिहिली आहे. दयासागर यांनीच परिस्थिती आणि प्रसंगानुरूप या सिनेमाचं अर्थपूर्ण संवादलेखनही केलं आहे. राहुल साळवे यांनी कथानकाला अनुसरून गीतलेखन केलं आहे, तर रोहन-रोहन या संगीतकार जोडीसोबत वसंत कडू यांनी गीतांवर स्वरसाज चढवला आहे. वास्तववादी कथानकाचं दर्शन घडवणा-या या चित्रपटाचं छायांकन सिनेमॅटोग्राफर सँटिनिओ टेझिओ यांनी केलं आहे. संदिप कुचिकोरवे या चित्रपटाचे कलादिग्दर्शन असून रविंद्र तुकाराम हरळे कार्यकारी निर्माते आहेत. जय घोंगे या सिनेमाचे प्रॉडक्शन मॅनेजर आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.