Pune : गायनातून सादर झाला लावणीचा सुरेल खानदानी प्रवास !

'सुंदरा मनामध्ये भरली ' कार्यक्रमाने जिंकली मने

एमपीसी न्यूज- नृत्य, संगीत अन अभिनयाचे सुंदर सादरीकरण म्हणजे ‘लावणी. पण ‘ सुंदरा मनामधे भरली ‘ या कार्यक्रमातून फक्त गायनातून लावणीचा सुरेल खानदानी प्रवास सादर झाला आणि रसिकांची मने जिंकली. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘सुंदरा मनामध्ये भरली ‘ या ‘स्वरश्रुती’ प्रस्तुत कार्यक्रमात लावणीचा गायनातून सुरेल खानदानी प्रवास सादर झाला !

‘शुभमंगल चरणी गण नाचला’ हा पेशवाईतील पठ्ठे बापुराव यांचा गण सुरुवातीला सादर झाला. 1951 मधील चित्रपटातील ‘ सांगा मुकुंद कोणी पाहिला’ ही गवळण , कृष्णाची लावणीला चांगला प्रतिसाद मिळाला.छबिदार छबी, कुण्या गावाचं आलं पाखरू, मुंबईची लावणी,होनाजी बाळा यांनी पेशव्यां च्या प्रेरणेने पुढे आणलेली बैठकीची लावणी, लावणीच्या प्रभावाने आलेली “वद जाऊ कुणाला शरण’ अशी नाट्यगीते,”माझी मैना गावाकडे राहिली” ही पाच चौकी लावणी , कसं काय पाटील बरं हाय का, अहो बरं हाय का ? काल काय ऐकलं, ते खरं हाय का ?अशा वैविध्यपूर्ण लावण्यांच्या जोरकस सादरीकरणाने हा कार्यक्रम गाजला.

वसंत प्रभू, राम कदम यांच्यापासून आनंद मोडक यांच्यापर्यंत प्रतिभाशाली संगीतकारांच्या संगीताने सजलेल्या, पठ्ठे बापुराव ते शांता शेळके ,जगदीश खेबुडकर यांचे कोमल, शृंगारपूर्ण शब्द आणि ख्यातनाम गायक गायिकांच्या लाडिक आवाजांच्या साजाची बरसातच या कार्यक्रमात झाली. रेशमाच्या रेघांनी, अरे कान्हा या प्रसिद्ध लावण्याच्या गायनाने समारोप झाला

या कार्यक्रमात राहुल जोशी, अभिजित वाडेकर, श्रुती देवस्थळी हे गायक आणि अमित कुटे, राजेंद्र साळुंखे, डॉ राजेंद्र दूरकर, प्रसन्न बाम हे वादक सहभागी झाले. प्राजक्ता मांडके –परहर यानी खुमासदार निवेदन, सूत्र संचालन केले. ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.