BNR-HDR-TOP-Mobile

Pune : शिरोळमधील मदतकार्यात लवासाच्या चमूचाही सहभाग

राज्यमंत्री भेगडे यांनी व्यक्त केले समाधान : लायन्स क्लबनेही केले सहकार्य

एमपीसी न्यूज – कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागात लवासातील व अँम्बी व्हॅलीतील कर्मचाऱ्यांच्या चमूने आठवडाभराहून अधिक काळ मदतकार्य केले. राज्याचे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांनी याबाबत या चमूचे अभिनंदन केले. 

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पुराची माहिती मिळताच जय ग्रूपचे सूजय शहा आणि अजय शहा यांनी भेगडे यांच्याशी संपर्क साधून मदतीची इच्छा व्यक्त केली होती. भेगडे यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने मदतकार्यात सहभागी होण्याची सूचना केली. त्यानुसार लवासा आणि अम्बी व्हॅलीतील कर्मचाऱ्यांचे दोन चमू 10 ऑगस्टला सांगली जिल्ह्यात दाखल झाले. लवासाचे 16 कर्मचारी, तर अम्बी व्हॅलीचे दहा कर्मचारी या मदतकार्यात सहभागी झाले होते.

लवासाच्या चमूने 4 मोटारबोट व 2 साध्या नौका बरोबर नेल्या होत्या. या चमूने मिरजमध्ये भेगडे यांची भेट घेतली. भेगडे यांच्या सूचनेनुसार या चमुंनी शिरोळ परिसरातील मदतकार्यात भाग घेतला. शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी, कुरुंदवाड, खिद्रापूरसह अनेक गावे व वाड्या वस्त्या महापुराने वेढल्या होत्या. नागरिकांसह पशुधनाच्या जीविताचा प्रश्न त्यामुळे गंभीर बनला होता. पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी आणणे आणि वाड्या वस्त्यांवर पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थ, जनावरांना चारा, पाणी आदी कामात आम्ही सहभागी झालो होतो.

पुरात अडकलेल्या तान्ह्या मुलांना दूध पुरवण्याचे कामही आम्ही केले, असे या चमूतील आशुतोष देशपांडे यांनी संध्यानंदशी बोलताना सांगितले. या मदतकार्यासाठी आम्हाला लायन्स क्लब जयसिंगपूर रॉयल्सचे सुदर्शन चौगुले, अजित चौगुले व शीतल बारवांडे यांनी सहकार्य केल्याचेही देशपांडे यांनी सांगितले.

पुराच्या पाण्यात अनेक ठिकाणी मगरी फिरताना दिसत होत्या. तसेच, अनेक घरांच्या छपरांवर साप व अन्य सरपटणारे प्राण्यांबरोबरच कुत्री, मांजरे अश पाळीव प्राण्यांनीही आश्रय घेतल्याचे दिसून आले. छपरांवर मोठ्या संख्येने आश्रयाला आलेले सरीसृप आणि मगरींचा वावर भयप्रद होता. मात्र, तरीही आम्ही मदतकार्य सुरू ठेवले. कुरुंदवाड परिसरात एका झाडावर एका बिबट्याने ठाण मांडले होते. त्याला चुकवून मदतकार्य करतानाही प्रारंभी भीतीचा अनुभव घ्यावा लागला, असेही देशपांडे यांनी सांगितले. पूरग्रस्त भागातील पाणी ओसरल्यानंतर हे चमू पुन्हा पुण्यास परतले आहेत.

या चमूंनी केलेल्या कामाबद्दल भेगडे यांनी समाधान व्यक्त केल्याचेही देशपांडे यांनी सांगितले.

.