Pune : 45 हजाराची लाच स्वीकारताना वकील एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी 45 हजार रुपयांची लाच स्वीकारताना वकीलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.  

राज उर्फ जाफर आयुब मुलानी (वय 29), असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 50 वर्षीय शेतक-याने तक्रार नोंदविली होती. ही कारवाई आज गुरुवारी (दि.22) करण्यात आली.

तक्रारदार यांच्या भावाविरुद्ध खडक पोलीस ठाणे पुणे शहर येथे भादवि कलम 420, 466 प्रमाणे गुन्हा दाखल असून त्यामध्ये त्यांच्या भावास अटक केलेली आहे.

_MPC_DIR_MPU_II

आरोपी मुलानी यांनी,” त्या गुन्ह्याच्या तपास अधिकाऱ्यास सांगून तक्रारदार यांचे भावाचा जामीन लवकर मिळवून देतो व गुन्ह्यातून 169 प्रमाणे वगळण्यास सांगतो, तसेच दुसऱ्या गुन्ह्यात अटक होऊन देणार नाही. त्यासाठी तपासी अंमलदार यांना एक लाख रुपये द्यावे लागतील”
असे सांगून , तडजोडीअंती पन्नास हजार रुपयांची मागणी करून पंचेचाळीस हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले असून शिवाजीनगर पोलीस ठाणे पुणे शहर येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मात्र, यातील लाचेची मागणी आणि स्वीकार या प्रक्रियेमध्ये संबंधित तपासी अधिकाऱ्याचा सहभाग/ संबंध आलेला नाही.

या कारवाईत प्रतिभा शेंडगे -पोलीस उपअधीक्षक, दत्तात्रय भापकर -पोलीस उपअधीक्षक, पोलीस कॉन्स्टेबल कुऱ्हे , पोलीस कॉन्स्टेबल थरकार, पोलीस कॉन्स्टेबल शिल्पा तुपे , चालक पोलीस कॉन्स्टेबल अभिजित राऊत यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.