Pimpri: पालिका मुख्यालयातील ‘एलबीटी’ विभागावर संक्रात!

एलबीटी विभागाचे आकुर्डीत तर, व्यायामशाळेचे मोरवाडीत स्थलांतरण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयातील काही विभागाचे स्थलांतरण केले जाणार आहे. दुस-या मजल्यावरील स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) विभागाचे आकुर्डीत स्थलांतरण केले जाणार आहे. त्याजागी तळघरातील भुमी आणि जिंदगी विभागाचे तर तळघरात अभिलेख कक्ष सुरु केला जाणार आहे. तर, तळघरातील व्यायामशाळा मोरवाडीत स्थलांतरित केली जाणार आहे. याबाबतचा निर्णय महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे. दरम्यान, आकुर्डीत एलबीटी विभागास जागा कमी पडत असल्याने पर्यायी जागा म्हणून नेहरुनगर येथील ‘क’ क्षेत्रीय कार्यालयात देखील जागेचा पर्याय पुढे आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची चार मजली इमारत आहे. पहिला, दुसरा आणि चौथ्या मजल्यावर विविध विभागांची कार्यालये आहेत. तर, तिस-या मजल्यावर पदाधिका-यांची दालने आहेत. आता महापालिकेतील विभागांचे स्थलांतरण केले जाणार आहे. अभिलेख कक्ष विभागाकडून मुख्य इमारतीत कक्ष कार्यान्वित करण्यासाठी प्रशस्त जागेची मागणी केली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने अभिलेख कक्ष मुख्य कार्यालयामध्ये असणे आवश्यक आहे. अस्तित्वात असेलेली सलग्नता, नियंत्रण आणि समन्वय यासर्व दृष्टीने सात हजार चौरस फुट जागेची आवश्यकता आहे. त्यासाठी तळघरात कार्यान्वित असलेला भुमी आणि जिंदगी विभागाचे स्थलांतरण केले जाणार आहे.

तर, भुमी आणि जिंदगी विभागाचे दुस-या मजल्यावरील एलबीटी विभागाचे जागी स्थलांतरण केले जाणार आहे. त्याचबरोबर तळमजल्यावरील व्यायामशाळेचे मोरवाडीतील सर्व नंबर 29 येथील ‘बी’ झोनच्या इमारतीमधील दुस-या मजल्यावर स्थलांतरण केले जाणार आहे. एलबीटी विभागाचे करसंकलन कार्यालयाच्या आकुर्डीतील कै. पांडुरंग काळभोर सभागृह या विभागीय कार्यालयात स्थलांतरण केले जाणार आहे.

  • …. ‘एलबीटी’ विभागाचे स्थलांतरण
    एलबीटी रद्द झाला असून कामाची मर्यादा असल्याने या विभागाचे स्थलांतरण केले जात आहे. तर, भुमी आणि जिंदगी विभाग हा महापालिकेच्या मालमत्तांचे नियोजनांचे मुख्य कार्य, मालमत्ता भाड्याने देणे. त्यातून महापालिकेला उत्पन्न मिळविणे. आर्थिक उत्पन्नात वाढ करणे अशी महत्वाची कामे आहेत. त्यामुळे या विभागाचे स्थान हे महापालिकेच्या मुख्यालयात असणे आवश्यक आहे, असे याबाबतच्या आदेशात म्हटले आहे.
  • ‘एलबीटी’च्या जागेसाठी याही पार्याचाच विचार व्हावा
    दरम्यान, आकुर्डीतील पांडुरंग काळभोर सभागृह कामकाजाच्या दृष्टीने योग्य नाही. आजूबाजूचा परिसर गावठाण आहे. कार्यालयात येण्या-जाण्यासाठी अरुंद रस्ते आहेत. एलबीटी विभागात कंपनीचे उच्चस्तरीय अधिकारी, उच्चवर्गीय व्यापारी येत असतात. त्यांच्या दृष्टीने एलबीटी विभागास देण्यात आलेली जागा सोईस्कर वाटत नाही. सद्यस्थितीत या विभागातील कर्मचारी कार्यालयात येऊन थम्ब आणि हजेरी लावून कंपनी तपासणीसाठी विविध ठिकाणी जातात. त्यानंतर संध्याकाळी थम्ब करण्यासाठी येतात. अशा कर्मचा-यांना आकुर्डी येथे जाण्या-येण्यासाठी सोईस्कर नाही. त्यामुळे कामकाजाच्या सोईच्या दृष्टीने एलबीटी विभागासाठी गरवारे कंपाऊड शेजारील बी झोनमधील इमारतीमधील गाळा क्रमांक 209 देण्याची मागणी, विभागप्रमुखांनी प्रशासनाकडे केली होती. त्याचबरोबर एलबीटी विभागास पर्यायी जागा म्हणून नेहरुनगर येथील ‘क’ क्षेत्रीय कार्यालयात जागेचा देखील पर्याय पुढे आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.