Vadgaon Maval : स्वतंत्र केबिनची मागणी पूर्ण न झाल्याने विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर यांनी केला सत्ताधाऱ्यांचा निषेध

एमपीसी न्यूज : वडगाव नगरपंचायतीच्या नूतनस्थलांतरित कार्यालयात विरोधी पक्षनेते व विरोधी नगरसेवकांना बसण्यासाठी स्वतंत्र केबिनची मागणी करूनही केबिनची व्यवस्था केलेली नाही. याबाबत विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सत्ताधाऱ्यांचा व प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे.

यासंदर्भात विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नगरपंचायत स्थापन होऊन तीन वर्षे झाली. नगरपंचायतच्या नूतन इमारतीचे बांधकाम होणार असल्याने कार्यालय दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

या स्थलांतरित कार्यालयात नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व इतर कामकाजासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु विरोधी पक्षनेते व विरोधी नगरसेवकांना बसण्यासाठी जागा नाही. याबाबत गटनेते दिनेश ढोरे यांनी दोन महिन्यांपूर्वी लेखी मागणीही केली होती.

परंतु नगरपंचायत प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले असून जनतेने सर्वसामान्य लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. किमान महिला पदाधिकारी म्हणून तरी बसायला जागा देणे आवश्यक होते. पण सत्ताधारी व प्रशासन मनमानी कारभार करत असल्याचा आरोप म्हाळसकर यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.