Pune : पुण्याच्या लोकसभा जागेवरून आघाडीत बिघाडी ?

पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवारांसाठी आग्रही

(अभिजीत दराडे)

एमपीसी न्यूज : अवघ्या काही महिन्यांवर लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार असल्याचे आता जवळ जवळ स्पष्ट झालेल असल तरी पुण्याची जागा या आघाडीत बिघाडी निर्माण करू शकते. पुणे लोकसभा मतदार संघ तसा कॉंग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ आहे. 2014 ला येथून विश्वजित कदम कॉंग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती.

एकीकडे वर्षभरावर येऊन ठेपलेल्या निवडणुकींसाठी आघाडीच्या गणितांची जुळवाजुळव सुरू असतानाच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पुण्याच्या जागेसाठी शरद पवार यांच्या नावाचा आग्रह धरल्याने त्यात व्यत्यय येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काँग्रेसमधून 1999 मध्ये बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.

त्यानंतर झालेल्या पहिली लोकसभा निवडणूक दोन्ही काँग्रेसने स्वतंत्रपणे लढविली. या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसमध्ये मतांचे विभाजन होऊन भाजपचे प्रदीप रावत खासदार म्हणून निवडून आले. हा धडा घेऊन, पुढे 2004 ची लोकसभा निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र लढविली. तेव्हापासून पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडेच होती. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यात लोकसभेचे चार मतदारसंघ येतात, त्यामधील बारामती, शिरूर आणि मावळ हे तीनही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. केवळ पुण्याची एकमेव जागा काँग्रेसकडे आहे. 2004 ते 2014 या कालावधीत सुरेश कलमाडी हे पुण्याचे काँग्रेसचे खासदार होते. 2014 च्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसचा पराभव झाला. आणि भाजपने ही जागा जिंकली.

गेली जवळपास पंधरा वर्षे पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडे असली तरी, पुण्यातील काँग्रेसचा जनाधार कमी होत गेला आहे; तर राष्ट्रवादी काँग्रेसचा आलेख वाढत गेला आहे. 2002 च्या पालिका निवडणुकीत काँग्रेसचे संख्याबळ 61 इतके होते. त्यानंतर 2007 ला ते 36 इतके घटले, पुढे 2012 ला 28 आणि 2017 ला तर ते 10 वर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मात्र संख्याबळ वाढत गेले आहे. 2002 मध्ये राष्ट्रवादीचे 22 नगरसेवक होते. 2007 ला ते 48, 2012 ला 52 आणि आता 2017 च्या निवडणूकीत 41 असे राष्ट्रवादीचे संख्याबळ आहे. त्यामुळे साहजकिच काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीचे ताकद जास्त असल्याचे पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीने हक्क सांगणे चुकीचे ठरणार नाही. मात्र काँग्रेस आपली हक्काची जागा इतक्या सहजासहजी सोडणार का असाही प्रश्‍न आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने लोकसभा मतदार संघांचे सर्वेक्षण केलेले आहे. आणि त्या त्या मतदार संघात कोणत्या पक्षाची ताकद आहे, त्याठिकाणी निवडणून येऊ शकतो याचे सर्व आकडे तयार आहेत. पुणे शहराच्या बाबतीत पुणे शहराची लोकसभेची जागा गेल्या अनेक वर्षांपासून कॉंग्रसकडे जरूर होती आजही हि जागा कोणाकडे राहणार याबाबतचा निर्णय शरद पवार आणि राहुल गांधीच घेणार आहेत. मात्र गेल्या 10 वर्षांमध्ये पुणे महापालिकेत राष्ट्रवादीची असणारी सत्ता पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी केलेलं काम आणि त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची वाढलेली ताकद पाहता हि जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे यावी असा आग्रह सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आहे. अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, आघाडी करत असताना ज्या मतदार संघात ज्या पक्षाकडे तुल्यबळ उमेदवार आहे त्या मतदार संघात ज्या पक्षाची ताकद आहे त्याला उमेदवारी दिली जाईल अशा प्रकारच तत्वतः धोरण मान्य केल आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी कडे येईल अशी खात्री असल्याच देखील अंकुश काकडे म्हणाले.

तर, आज अनेक वर्षांपासून आमच्या सारखे असंख्य कार्यकर्ते शरद पवार यांच्याबरोबर काम करत आहेत पण दुर्दैवाने आम्हाला आजपर्यंत आम्हाला त्यांना मतदान करता आले नाही. एकदा केव्हातरी पवार साहेबांना मतदान करण्याची संधी मिळावी त्यासाठी पवार साहेबांनी पुण्यातून निवडणूक लढावी. त्यांना मतदान करताना पुणेकरांना निश्चितच आनंद होणार आहे कारण त्यांची कारकीर्द ही पुण्यातून सुरु झाली आहे. अशा रीतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पुण्यातून शरद पवार यांच्या नावासाठी आग्रही असल्याच प्रवक्ते अंकुश काकडे यांनी स्पष्ट केल आहे.

तर याउलट कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी यावर बोलण्यास नकार देत याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील अस सांगत ‘सेफ गेम’ खेळला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.