Pune News : आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी 31 मे ला आरक्षण सोडत 

एमपीसी न्यूज : पुणे महापालिका निवडणूकीसाठी प्रभागामधील महिला, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती या प्रवर्गांसाठी आरक्षण सोडत येत्या 31 मे रोजी होणार आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतच्या सुचना निवडणूक आयोगाकडून सोमवारी महापालिका प्रशासनाला देण्यात आल्या.

महापालिकेची निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पध्दतीने होणार आहे. पुण्यातील नगरसेवकांची संख्या 173 असणार आहे. यासाठी तीन सदस्यांचे 57 प्रभाग आणि दोन सदस्यांचा एक प्रभाग करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचनेला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता प्रभाग निहाय आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण असणार आहे. यामुळे पुरुष नगरसेवकांची संख्या 86 तर तर महिलांची संख्या 87 असणार आहे.

महापालिका निवडणूकीसाठी अनुसुचित जातीसाठी 23 जागा राखीव असणार आहेत. यामध्ये 12 महिला आणि 11 पुरुषांचा समावेश आहे. अनुसुचित जमातीसाठी 2 जागा असणार असून पुरुष आणि महिलांसाठी प्रत्येकी एक जागा आहे. आरक्षण सोडतीमध्ये अ प्रभाग हा अनुसुचित जातीसाठी, ब प्रभाग अनुसुचित जमातीसाठी असणार आहे.

महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्यांदा अनुसूचित जातीचे आरक्षण सोडत काढण्यात येईल. त्यानंतर अनुसुचित जमातीचे सोडत काढण्यात येणार आहे. लोकसंख्येच्या ज्या प्रभागात आरक्षण टाकण्यात आले आहे त्यासाठी महिला की पुरुष हे आरक्षणामधून निश्‍चित होईल.

पुण्यात 58 प्रभागात महिला आरक्षण असेल त्यामुळे पुन्हा 29 प्रभागामध्ये चिठ्यांमधून महिला आरक्षण पडेल. म्हणजेच 29 प्रभागामध्ये दोन महिला असणार आहेत. एका प्रभागात अ, ब, क अशा जागा असतील. सोडतीनंतर 1 जूनला प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्यात येईल. 6 जूनपर्यंत हरकती आणि सुचना घेण्यात येतील. सुनावणीनंतर 13 जुनला प्रभाग निहाय अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिध्द करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.