PCMC Election 2022: चिंचवडमध्ये मंगळवारी ओबीसीविना काढणार आरक्षण सोडत

एमपीसी न्यूज – आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (एससी) महिला, अनुसूचित जमाती (एसटी) महिला आणि सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागांची सोडत येत्या मंगळवारी (दि.31) सकाळी 11 वाजता काढली जाणार आहे. इच्छुकांचे आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले असून सोडतीसाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मंगळवारी सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत काढण्यास सुरुवात होईल. ए-फोर साईजच्या को-या कागदावरुन आरक्षणाच्या चिठ्ठया तयार केल्या जातील.  एका रंगाच्या रबरने त्या गुंडाळल्या जातील.  लहान मुलांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्या काढल्या जातील. सुरुवातीला एससी महिला, एसटी महिला आणि शेवटी सर्वसाधारण (महिलां)ची सोडत काढली जाईल. एससीसाठी 22 जागा राखीव आहेत. त्यातील महिलांसाठीच्या 11 जागांकरिता सोडत काढली जाईल. उर्वरीत 11 जागा जनरल म्हणजेच एससीतील महिला, पुरुषांसाठी राहतील. एसटीसाठी 3 जागा असून महिलांसाठीच्या 2 जागांकरिता सोडत काढली जाईल. 1 जागा एसटीच्या पुरुष, महिलेसाठी राहील.

तर, महिलांसाठी एकूण 70 जागा आहेत. त्यातील एससीच्या 11 आणि एसटीच्या 2 अशा 13 जागा होतात. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील 57 महिलांच्या जागांसाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे.  इच्छुकांचे सोडतीकडे लक्ष लागले आहे. महिला आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर कोण सुपात आणि कोण जात्यात, हे स्पष्ट होणार आहे. अनेक माजी नगरसेवकांना याबाबतची चिंता लागून राहिली आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीनंतर काही नगरसेवकांना अन्य प्रभागांत संधी शोधावी लागेल अथवा कुटुंबातील महिलेला संधी द्यावी लागणार आहे.

114 जागा खुल्या प्रवर्गासाठी!
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत 46 प्रभाग तर नगरसेवक संख्या 139 असणार आहे. 139 नगरसेवकांपैकी 69 पुरुष तर 70 महिला नगरसेविका अशी वर्गवारी असेल. 139 नगरसेवकांपैकी 3 जागा अनुसूचित जमाती (एसटी)साठी तर 22 जागा अनुसूचित जाती (एससी)साठी राखीव असतील. ओबीसी आरक्षण मिळाले असते तर 38 जागा ओबीसींसाठी राखीव राहिल्या असत्या. तुर्तास आरक्षणाविना निवडणूक होण्याची शक्यता असल्याने ओबीसी प्रवर्गातून लढण्याची 38 जणांची संधी गेली आहे. त्यामुळे 114 जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूक होईल.

…तर मंगळवारी काढलेले आरक्षण होईल रद्द 
राज्य सरकार ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक न घेण्यावर ठाम आहे. ओबीसी आरक्षणासाठीचा आवश्यक डेटा गोळा करण्याचे समर्पित आयोगाचे काम वेगात सुरु आहे. निवडणुकांच्या तारख्या जाहीर होण्यापूर्वी ओबीसी समाजाला आरक्षण मिळेल असे सरकारमधील मंत्र्यांकडून सांगितले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने ज्या भागात कमी पाऊस पडतो. त्या भागात निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला. मंगळवारी एससी, एसटीसह सर्वधारण प्रवर्गातील जागांसाठी महिलांचे आरक्षण काढले जाणार आहे.

पण, मतदार यादा विभाजन, निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यात जूनचा महिना जाऊ शकतो. त्यामुळे जास्त पावसाचा महिना असलेल्या जुलै मध्ये निवडणूक होण्याची शक्यता कमी आहे. तोपर्यंत ओबीसी आरक्षणासाठीचा आवश्यक डेटा गोळा करुन तो सर्वोच्च न्यायालयात सादर होईल. मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रालाही आरक्षण मिळाल्यास मंगळवारी काढली जाणारी सोडत रद्द होईल. पुन्हा नव्याने सोडत काढली जाईल. खुल्या प्रवर्गातील जागांमधून ओबीसींसाठी आरक्षण सोडत काढण्यात येईल. एससी, एसटीची सोडत कायम राहू शकते.

…असा आहे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम
अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) आणि सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागांची सोडत मंगळवारी काढली जाणार आहे. सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप 1 जून रोजी प्रसिद्ध केले जाणार आहे. प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत 1 ते 6 जून 2022 दरम्यान हरकती व सूचना दाखल करता येतील. आरक्षण निश्चितीबाबत प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांवर विचार करुन प्रभागनिहाय अंतिम आरक्षण 13 जून रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध केले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.