Mumbai: ‘खबरदार ! सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास अथवा धुम्रपान केल्यास कारवाई’

legal action will be taken for spitting or smoking in public places says health minister rajesh tope

एमपीसी न्यूज- सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन तसेच थुंकण्यास व धुम्रपान करण्यास प्रतिबंध करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असून, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना दंडासह शिक्षा ठोठावण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

यापुढे सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या, धुम्रपान करणाऱ्या मुंबई पोलीस अधिनियमानुसार पहिल्या गुन्ह्यासाठी एक हजार रुपये दंड व एक दिवस सार्वजनिक सेवा करावी लागेल.

त्याच व्यक्तीच्या दुसऱ्या गुन्ह्यासाठी 3 हजार रुपये दंड व 3 दिवस सार्वजनिक सेवा आणि तिसऱ्या व त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी 5 हजार रुपये दंड व 5 दिवस सार्वजनिक सेवा अशा शिक्षेची तरतूद आहे.

भारतीय दंड संहितनेनुसार विविध कलमांनुसार 6 महिने, 2 वर्ष शिक्षा व दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधताना कोरोना प्रतिबंधासाठी घेण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देताना सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे अनेक संसर्गजन्य व प्राणघातक आजारांचा फैलाव होतो.

आता तर कोरोनासारख्या महामारीचा संसर्ग हा थुंकीच्या माध्यमातून होत असल्याचे निष्पन्न झाल्याने याबाबत दक्षता घेऊन जनतेच्या हितासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयाची अमंलबजावणी करण्यासाठी साथरोग अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन कायद्यामधील तरतुदींनुसार राज्यात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, थुंकण्यास व धुम्रपानास प्रतिबंध करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.