Jagdeep Death: प्रसिद्ध विनोदी अभिनेते जगदीप यांचे निधन

legendary actor and comedian jagdeep dies at the age of eighty one जावेद जाफरी व नावेद जाफरी हे त्यांचे पुत्र आहेत. ते दोघे नृत्य कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत.

एमपीसी न्यूज- हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज विनोद अभिनेते जगदीप यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले. बुधवारी (दि.8) रात्री 8.40 वाजता त्यांनी मुंबईतील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे खरे नाव सय्यद इश्तियाक अहमद जाफरी असे होते. त्यांचा जन्म 29 मार्च 1939 रोजी मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात झाला होता. जगदीप यांनी 400 हून अधिक चित्रपटांत काम केले होते. 1975 साली रिलीज झालेल्या सुपरहिट सिनेमा ‘शोले’तील सुरमा भोपाली ही त्यांची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. जावेद जाफरी व नावेद जाफरी हे त्यांचे पुत्र आहेत. ते दोघे नृत्य कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत.

जगदीप यांची ‘पुराना मंदिर’मधील मच्छरची भूमिका आणि ‘अंदाज अपना अपना’मधील सलमान खानच्या वडिलांच्या भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. त्यांनी एका सिनेमाचे दिग्दर्शनही केले होते. विशेष म्हणजे त्या सिनेमाचे नाव ‘सुरमा भोपाली’ असे होते. यात प्रमुख भूमिकाही त्यांनीच केली होती.

जगदीप यांनी सिनेसृष्टीत आपल्या कारकीर्दीची सुरुवात 1951 मध्ये बी.आर.चोप्रा यांच्या ‘अफसाना’ मधून केली होती. या सिनेमात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यांनी अनेक सिनेमांत बालकलाकार म्हणून काम केले. यामध्ये गुरुदत्त यांचा आरपार, विमल रॉय यांचा दो बीघा जमीनसारख्या सिनेमांचा समावेश आहे.

मागील तीन महिन्यात बॉलिवूडमधील पाच दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.