Pune: जुलै महिना संपला तरी पावसाचा पत्ता नाही; धरणांत केवळ 9.87 टीएमसी पाणीसाठा

less rain in pune in July month, Only 9.87 TMC of water is stored in the dams यंदा पुण्यातून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे आहे त्या पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

एमपीसी न्यूज – पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत सध्या केवळ 9.87 टीएमसी म्हणजेच 33.85 टक्के पाणीसाठा आहे. जून महिन्यात सुरुवातीला काही दिवस हजेरी लावणाऱ्या पावसाने आता ओढ दिली आहे. जुलै महिना संपला. मात्र, पावसाचा पत्ता नाही. आज येणार, उद्या येणार, चांगला पाऊस होणार, अशा प्रकारचा अंदाज हवामान खात्यातर्फे देण्यात येत आहे.

यंदा पुण्यातून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे आहे त्या पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत धरणांत 20.43 टीएमसी म्हणजेच 70 टक्के पाणीसाठा होता. सध्या तब्बल 55 टक्के पाणी कमी आहे. या चारही धरणांची एकूण क्षमता 29.15 टीएमसी आहे.

पुणे महापालिका शहरात दोन वेळा पाणीपुरवठा करीत असल्याने महिन्याला सव्वा ते दीड टीएमसी पाणी उचलते. वर्षाला महापालिकेला 11.50 टीएमसी पाणी कोटा मंजूर आहे. प्रत्यक्षात महापालिका वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात तब्बल 18 टीएमसी पाणी उचलते.

सध्या उपलब्ध असलेल्या 9.87 टीएमसी पाणीसाठा विचारत घेता, पुणेकरांना 5 ते 6 महिने हा पाणीसाठा पुरणार असल्याची माहिती महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणांत 0.73 टीएमसी, पानशेत 4.30, वरसगाव 4.11, टेमघर 0.73 असा एकूण 9.87 टीएमसी पाणीसाठा आहे. आणखी पाऊस लांबल्यास पुणेकरांवर पाणीकपात निश्चित असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार घेणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.