Pimpri : ‘चला जाऊ या’ ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी

शब्दधन काव्यमंचचा उपक्रम; मधुर गीताने कार्यक्रमाची सुरुवात

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी जाऊन साहित्य संवाद साधणे, मनमोकळी चर्चा करणे, त्यांच्या लेखन आणि काव्याचे वाचन करणे आणि त्या साहित्यिकांचा यथोचित सन्मान करणे हा नाविन्यपूर्ण उपक्रम शब्दधन काव्यमंच संस्थेने नवीन वर्षात सुरू केला आहे.

या नवीन उपक्रमाचा शुभारंभ ज्येष्ठ साहित्यिक बाबू डिसोजा यांच्या घरी शहरातील नामवंत साहित्यिक उपस्थित राहिले. बाळासाहेब घस्ते यांच्या ज्योतसे ज्योत जलाते चलो, प्रेमकी गंगा बहाते चलो..या मधुर गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

ज्येष्ठ साहित्यिक प्रा.तुकाराम पाटील यावेळी म्हणाले, “बाबूजींकडे समाजावलोकनाची चौकस नजर आहे. तिला वैचारिकतेची आणि जगण्याच्या उत्कटतेची अखंड सोबत आहे. चेतना, संवेदना आणि कार्यतत्परता यांचा हृदयस्पर्शी मेळ म्हणजे बाबूजी.त्यांना भावलेल्या बाबू डिसोजांच्या स्वरंग, सांप्रत या कवितांचे वाचन व रसग्रहणही त्यांनी केले.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रजनी अहेरराव म्हणाल्या, “ज्येष्ठ साहित्यिक हे समाजाचे दीपस्तंभ असतात. त्यांचे स्मरण करणे आणि यथोचित गौरव करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. हे पवित्रकार्य शब्दधन काव्यमंच ही संस्था करत आहे. याचाच अर्थ आजही आमची नीतिमूल्ये अबाधित आहेत. हिच प्रेरणा प्रत्येक नवोदितांना मिळायला हवी.”

बाबु डिसोजा यांच्या समग्र साहित्यिक कार्याचा परिचय नंदकुमार मुरडे यांनी करून दिला. ज्येष्ठ साहित्यिक रजनी राज अहेरराव यांच्या हस्ते बाबू डिसोजा आणि माधुरी डिसोजा यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्यांना पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. यावेळी शोभा जोशींनी काव्यमय शुभेच्छा दिल्या. कैलास भैरट, माधुरी विधाटे, मीरा कंक, आय.के.शेख, निशिकांत गुमास्ते, तानाजी एकोंडे, मुरलीधर दळवी, अंतरा देशपांडे, रामचंद्र आडकर, सुप्रिया सोळांकुरे, राधाताई वाघमारे,प्राची देशपांडे,आनंद मुळूक,शरद काणेकर,कांचन नेवे,सुप्रिया डिसोजा, अंजली गजभार आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सविता इंगळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश कंक यांनी केले. आभार सुभाष चव्हाण यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.