Pune : ‘भारतरत्न स्वातंत्र्यवीर सावरकर’ म्हणायला सुरुवात करूया

शरद पोंक्षे : स्वर गंधर्व संगीत महोत्सवात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ विषयावर व्याख्यान

एमपीसी न्यूज – बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य आणि ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी सरकारने दिलेली नाही. तरीही लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले असे म्हणणे रूढ झाले आहे. वि. दा. सावरकर यांना सरकार भारतरत्नही देणार नाही त्यामुळे आजपासून आपणच भारतरत्न स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणण्यास सुरुवात करू असे आग्रही प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी सावरकरप्रेमी नागरिकांना आज केली. पोंक्षे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘भारतरत्न स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा एकच जल्लोष करण्यात आला.

निमित्त होते ते समर्थ प्रॉडक्शन प्रस्तूत आणि मातृमंदिर विश्वस्त संस्था आयोजित स्वर गंधर्व संगीत महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी (दि. 9) शरद पोंक्षे यांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावरील व्याख्यानाचे. सावरकर यांच्यावरील विचार ऐकण्यासाठी सावरकर प्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. केंद्रप्रमुख वामनराव अभ्यंकर, ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ विश्वास मेहेंदळे, नगरसेवक अमित गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

हिंदुस्थान हिंदूराष्ट्र व्हावे यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर कायम आग्रही होते, असे नमूद करून पोंक्षे म्हणाले, जगाचा इतिहास पाहिला तर ज्या लोकांची संख्या जास्त त्या नावाने त्या-त्या देशाची ओळख आहे. आपल्याकडे निधर्मी राष्ट्र अशी घोषणा दिली जाते, पण निधर्मी हा शब्दच नाही. धर्म म्हणजे काय याचा अर्थ कुणीच जाणून घेत नाही. सावरकरांना जन्माधिष्ठीत जात मान्य नव्हती. धर्म या विचाराला आज फार संकुचित करण्यात आले आहे. धर्म म्हणजे गुणधर्म. हे गुणधर्म निसर्गाने जन्मजात बहला केले आहेत. मनुष्य जन्माला येतो तो हिंदू म्हणूनच. मनुष्याच्या जन्मानंतर त्याच्यावर धार्मिक विधी करुन तो कुठल्या जातीचा हे ठरविले जाते. वास्तविक माणुसकीचा धर्म म्हणजे हिंदूधर्म.

ते पुढे म्हणाले, ज्यांचे पूर्वज या भूमीतील आहेत, ज्यांची तीर्थक्षेत्रे या भूमितील आहेत तो हिंदू. आपले मूळ पुरूष सप्तसिंधूच्या काठावरील असल्याने आपण हिंदू. जगात हिंदूराष्ट्र एकच आहे त्याला सरकारच्या मान्यतेची गरज नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या दूरदृष्टीविषयी बोलताना पोंक्षे म्हणाले, काळ्यापाण्याची शिक्षा भोगण्यासाठी सावरकर यांना जेंव्हा अंदमानला पाठविण्यात आले त्यावेळी हिंदुस्थान स्वतंत्र्य झाल्यानंतर पहिले आरमाराचे केंद्र येथे होईल, असे म्हणाले होते ते आज सत्यात उतरले आहे. हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या संरक्षण सज्जतेसाठी त्या वेळच्या पंतप्रधानांना सावरकर यांनी पत्र दिले होते. सावरकर यांच्या सांगण्याप्रमाणे देशाने अणुबॉम्बची निर्मिती केली असती तर चीनविरुद्ध आपण लढाई हरलो नसतो. अणुबॉम्ब नाकारणार्‍या नेहरूंच्या मुलीला मात्र सावरकर उमगले. राजाला अहिंसक होण्याचा अधिकार नसल्याचे सांगून छत्रपती शिवाजीमहाराज होते म्हणून आज आपण हिंदू म्हणून जगू शकत आहोत असे नमूद केले.

सावरकर यांना बदनाम करण्यासाठी यंत्रण जाणीवपूर्वक राबतेय. सावरकर यांना का बदनाम करण्यात येत आहे याविषयी अभ्यास केला तेव्हा त्याचा कारण त्यांच्या अडनावात असल्याचे जाणवले. एका मुर्खामुळे सावरकर हा शब्द प्रसिद्ध झाल्याबद्दल त्याचे आभार मानतो असे उपरोधाने नमूद करून ज्याला आपल्या आजीचा इतिहास माहित नाही त्याला सावरकर काय समजणार? इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी सावरकर यांच्यावर टपाल तिकिट काढले, मुंबईत राष्ट्रीय स्मारक उभारले गेले त्यावेळी गांधी यांनी वैयक्तिक 15 हजारांची देणगी दिल्याची आठवण पोंक्षे यांनी करून दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली पाथरे यांनी केले. आभार सचिन चपळगावकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.