Eknath Shinde Update : “पत्रास कारण की…” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बंडखोर आमदारांकडून पत्र

एमपीसी न्यूज – शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Update) आणि इतर शिवसेना आमदार यांनी बंड पुकारल्याने राज्यातील सरकार कोसळणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. हिंदुत्वाची भूमिका ठामपणे मांडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ललकारणाऱ्या आमदारांनी आज (दि. 23 जून) सोशल मिडीयावर एक पत्र व्हायरल केले आहे. त्यावर “ही आहे आमदारांची भावना” असे पत्राला प्रत्युत्तर देत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे बंडामागच्या कारणाकडे लक्ष वेधले आहे. 

शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी लिहिलेले पत्र मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Update) यांनी सोशल मिडीयावर व्हायरल केले आहे. वेगवेगळ्या कारणांकडे लक्ष वेधून घेत आमदारांच्या बंडामागची भूमिका शिरसाठ यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. व्हायरल झालेल्या पत्रानंतर इतर पक्षांची यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून राजकारणाच्या या युद्धभूमीवर कोणाची सरशी होणार याकडे लक्ष लागले आहे.

आमदार शिरसाठ यांनी ‘मुख्यमंत्री शिवसेना आमदारांना वर्षावर भेटत नव्हते’ अशी खंत व्यक्त करताना काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली अशा भावना व्यक्त केल्या आहे. पत्रात शिरसाठ लिहितात, ही दारं गेली अडीज वर्षे शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी  आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करावी लागत होती. हेच so called (चाणक्य कारकून) बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणणीती ठरवत होते, असे लिहून बंडखोर आमदारांमधील खदखद शिरसाठ यांनी या पत्रात मांडली आहे.

Eknath Shinde Update : शिंदे गटात आणखी ‘हे’ आमदार दाखल; शिवसेना नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

पुढे शिरसाठ लिहितात, साहेब जेव्हा आम्हाला प्रवेश मिळत नव्हता तेव्हा आमचे खरे विरोधक काॅंग्रेस राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला नियमित भेटत होते, मतदारसंघातली कामं करत होते. निधी मिळाल्याची पत्रं नाचवत होते. भूमीपुजन, उद्घाटन करत होते, तुमच्यासोबत काढलेले फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करत होते. त्यावेळी आमच्या मतदारसंघातले लोक की मुख्यमंत्री आपला आहे ना मग आपल्या विरोधकांना निधी कसा मिळतो? असा अनुत्तरीत प्रश्न शिरसाठ यांनी पत्रातून मांडला आहे.

पक्षप्रमुखानं गटनेता नेमायचा असतो, मुख्यमंत्र्यांनी अजय चौधरींची नेमणूक केलीय, ते पत्र मी स्वीकारलंय : नरहरी झिरवाळ

मुख्यमंत्री भेटत नाही हे केवळ एकच कारण नाही तर शिवसेनेच्या आमदारांना मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत अयोद्धेस का पाठवले नाही असा सवाल सुद्धा या पत्रातून विचारण्यात आला आहे. शिवसेना नेते संजय शिरसाठ यांच्या पत्राला पाठिंबा दर्शवत “ही आहे आमदारांची भावना” असे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Update) यांनी म्हटले आहे.

पत्ररूपी बाहेर पडलेली शिवसेना आमदारांमधील या खदखदीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कसे प्रत्युत्तर देणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यातील बिघडलेल्या या राजकीय गुणोत्तरांचे उत्तर नेमकं काय मिळणार याकडे राज्यातील नव्हे तर अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.