Lifestyle: घरी बसल्याबसल्या प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काही सोपे उपाय

Lifestyle: Some easy ways to boost immunity while sitting at home

एमपीसी न्यूज – आपल्याला काही रोग होऊच नये ही सगळ्यात आदर्श स्थिती असते. पण असे नेहमीच शक्य होत नाही. काही वेळा आपण शरीराच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे रोग होतात. मात्र शरीराची स्वतची अशी प्रतिकारशक्ती असते. त्यामुळे शरीरातील हे सैनिक रोग परतवून लावतात. अर्थातच आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तरच हे शक्य होते. तेव्हा चांगली रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणे हे आपल्याच हातात असते.

आपण जे खातो त्यामार्फत आपल्या शरीराचे पोषण होते आणि रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. शरीराच्या वाढीसाठी ही पोषकमूल्ये कर्बोदके, अ‍ॅमिनो, अ‍ॅसिड्स, लिपिडस, जीवनसत्वे, खनिजे, पाणी आणि तंतूंच्या स्वरुपात येतात. या पोषक घटकांमध्येच रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारे असून ते आपल्या रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास तसेच शरीराला रोगाविरुद्ध लढण्यास मदत करतात. त्यामुळे आपल्याला ‘रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पोषक घटकांचा’ स्थिर आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.

उपयुक्त प्रथिनांनी भरपूर असे डाळ, कडधान्ये, अंडी, पोल्ट्रीज यासारखे उच्च जैविक मूल्य असलेले प्रथिने, फायबर आणि अँटी ऑक्सिडंट्सनी भरपूर असलेल्या भाज्या, फळे, प्रोबायोटिकने समृद्ध असलेले दही, तीळ, कारळाच्या बियांसारखे पोषक पदार्थांचा समावेश आहे.

लसूण, आले, लिंबू, दही किंवा ताक, आवळा, दालचिनी, ताजी फळे आणि भाज्या, आक्रोड, बदाम, जवस, सूर्यफूल बिया तसेच काळ्या मनुका, अंजीर, राजगिरा, तुळशीची पाने, हळद, काळी मिरी, भरपूर टोमॅटो हे सर्व तुमच्या दैनंदिन आहारात असले पाहिजे. हे सर्व रोगप्रतिकारशक्ती वर्धक आहेत.

ग्रीन टी, ताक, लिंबाचा रस, नारळपाणी आणि साध्या पाण्याच्या स्वरुपात भरपूर द्रवपदार्थ प्यावे.

एकदाच भरपूर जेवण्याऐवजी वारंवार थोड्या प्रमाणात खा. नाश्ता आणि जेवण हे दोन्ही संतुलित असावेत.

स्वयंपाकात मध्यम प्रमाणात मीठ वापरा. जागतिक आरोग्य संघटनेने दररोज 5 ते 6 ग्रॅम मीठ सेवन करण्याची शिफारस केली आहे. टेबलवर घेतलेल्या अन्नात मीठ घालणे टाळावे.

साखरयुक्त आणि अति तळलेले पदार्थ खाऊ नका. यामुळे वजन वाढते.

सर्व खाद्यपदार्थांमध्ये विविध स्तरांचे पोषक घटक असतात. कोणत्याही एका अन्नात सर्व महत्त्वाचे शरीरास आवश्यक असे पोषक घटक पुरेशा प्रमाणात समाविष्ट नसतात.

राजगिरा, अंजीर, आवळा, सफरचंद, सुका मेवा आणि जवस हे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कसे आवश्यक आहेत, याविषयी काही तथ्य:

राजगिरा – राजगिरा हे अत्यंत पौष्टिक आणि ग्लूटेनरहित धान्य आहे. यात भरपूर प्रथिनयुक्त, फायबर, मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि अँटी ऑक्सिडंट्स असतात. विशेषतत: मॅगनीज, मॅग्नेशिअम, फॉस्फरस आणि लोह यासारख्या आरोग्यास प्रोत्साहित करणाऱ्या अँटी ऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहेत. याद्वारे आपली रोगप्रतिकारक यंत्रणा मजबूत होते व कर्करोग, हृदयरोग यासारख्या तसेच संसर्गजन्य आजारापासून आपले संरक्षण होते.

जवसाचे बी – जवसाच्या बियांमध्ये ओमेगा थ्री फॅटी अ‍ॅसिड, एमयूएफए, फोलेट, व्हिटॅमिन बी 1 आणि बी 6, फायबर हे मोठ्या प्रमाणावर असते. जवसाची चटणी बनवून ठेवल्यास त्याचा उत्तम उपयोग होतो.

अंजीर- अंजीर हे कॅल्शिअम, पोटॅशिअम, झिंक, कॉपर आणि ब जीवनस्त्व, फायबर यांचा मोठा स्रोत आहे. अंजिरात उत्तम दर्जाचे अँटी ऑक्सिडंट्स असून ते शरीरातील पेशींना इजा करणारे रॅडिकल्स कमी करण्याचे काम करतात.

आवळा – आवळा हे क जीवनसत्त्वाने समृद्ध आहे. यामुळे शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेला बळ देण्याचे काम केले जाते.  कर्करोगाच्या पेशींच्या वाढीविरोधात लढण्यासाठी हे ओळखले जातात.

सफरचंद – या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या फळाचे अनेक फायदेही आहेत. यात पोषक रोगप्रतिकारक यंत्रणेसाठी तसेच आतड्यातील चांगल्या जीवाणूंच्या वाढीस आवश्यक असलेले फायबर मोठ्या प्रमाणावर असतात. अभ्यासाअंती हे सिद्ध झाले आहे की, सफरचंदातील विरघळणाऱ्या फायबरमुळे लठ्ठपणाशी निगडीत दाह कमी होतो आणि प्रतिकारक शक्ती मजबूत होते.

नट्स व सुकामेवा – नट्समध्ये भरपूर प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, मॅँगनीज, सेलेनियम इत्यादी असतात. यामुळे रोगप्रितकारक पेशी तसेच अँटीबॉडीज वाढतात. तसेच हे सुक्या मेव्यासोबत खाल्ल्यास प्रथिने आणि साखरेसह उत्तम प्रमाणात संतुलित जेवण होते. मात्र यासाठी योग्य नट्स निवडावेत. उदा. आक्रोड, बदाम, ब्राझील काजू, पिस्ता इत्यादी.

या सर्व खाद्यपदार्थांचा आपल्या जेवणात आणि खाण्यात योग्य तो वापर करुन आपण आपली प्रतिकारशक्ती वाढवू शकतो. त्यामुळे फक्त करोनाच नाही तर इतर आजारही दूर ठेवू शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.