Pimpri : महापौरपदासाठी भोसरी आणि चिंचवडकरांमध्ये रस्सीखेच, ‘या’ सहा नगरसेविका प्रबळ दावेदार

इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी आपल्या समर्थकाला विराजमान करण्यासाठी शहरातील नेत्यांनी वरिष्ठांकडे ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. शहरातील सत्ताकेंद्र असलेल्या चिंचवड आणि भोसरीकरांमध्ये महापौरपदासाठी रस्सीखेच असणार आहे.  इच्छुकांनी देखील मोर्चेबांधणी सुरु केली असून शहराचे 26 वे आणि सातवी महिला महापौर कोण होणार? याची उत्सुक्ता लागली आहे. दरम्यान, महापौरपदासाठी माई ढोरे, झामाबाई बारणे, माया बारणे, माधुरी कुलकर्णी, निर्मला गायकवाड, भीमाबाई फुगे यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. अचानक धक्कातंत्र अवलंबित वेगळेच नाव पुढे येण्याची देखील शक्यता आहे.

शहराचे महापौरपद पुढील अडीच वर्षाकरिता सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. सत्ताधारी भाजपकडून खुला प्रवर्गातून 21 महिला निवडून आल्या आहेत. चिंचवडकरांकडे महापौरपद गेल्यास माई ढोरे, झामाबाई बारणे, माया बारणे अथवा अचानक माधुरी कुलकर्णी यांचे नाव पुढे येऊ शकते. तर, भोसरीकरांकडे कायम राहिल्यास निर्मला गायकवाड, भिमाबाई फुगे महापौरपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.

त्याचबरोबर पिंपरीतील नगरसेवकांनी देखील महापौरपदाची मागणी केली आहे. त्यामुळे सुजाता पालांडे यांच्या देखील नावाची जोरदार चर्चा आहे. सलग तीन वर्ष स्थायी समितीचे अध्यक्षपद चिंचवडकरांच्या समर्थकांकडे राहिल्याने महापौरपद भोसरीकरांकडे कायम राहण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पिंपरी भाजपमध्ये शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांचे दोन गट आहेत. तर, खासदार अमर साबळे यांच्यासह निष्ठावंतांचा तिसरा गट आहे. अडीच वर्षात महापालिकेतील पदे आमदारांच्या शिफारशीनुसारच दिली आहेत. त्यामुळे आमदारांचा गट महापालिकेच्या राजकारणात वरचढ ठरला आहे.

पहिले अडीच वर्ष भोसरीकडे महापौरपद राहिले आहे. त्यामुळे आता दुसरे अडीच वर्ष चिंचवडकडे महापौरपद राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पद देताना विधानसभा निवडणुकीतील प्रभागातील मताधिक्य, प्रभागात पक्षाची बांधणीचा निकष ग्राह्य धरला जाण्याची शक्यता आहे.

महापौरपदाचा उमेदवार प्रदेश स्तरावरुन निश्चित केला जाणार आहे. त्यामुळे आपल्या समर्थकाला महापौरपद मिळण्यासाठी आमदारांनी वरिष्ठांकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. महापौरपद आपल्या समर्थकाकडे ठेवण्यात चिंचवड की भोसरीकर यशस्वी होतात हे शनिवारी स्पष्ट होणार आहे.

प्रदेशाध्यक्ष धक्कातंत्र राबविणार?

महापालिकेतील पदाबांबत यापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि पुण्याचे माजी पालकमंत्री गिरीश बापट निर्णय घेत होते. आमदारांनी केलेल्या नावाच्या शिफारशीवर त्यांच्याकडून शिक्कामोर्तब केले जात होते. आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत. पुण्याचे सुत्रे देखील त्यांच्याकडेच आहेत. त्यामुळे महापौरपदाचे नाव तेच निश्चित करणार आहेत. लोक-लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन यांचे पाटील यांच्याशी घनिष्ट संबंध आहेत. त्यामुळे महापौर ठरविताना पटवर्धन यांच्या भूमिकेला देखील महत्व असल्याचे बोलले जात आहे.

‘या’ नगरसेविका आहेत महापौरपदासाठी दावेदार

सत्ताधारी भाजपकडून खुला प्रवर्गातून निवडून आलेल्या सारीका सस्ते, निर्मला गायकवाड, प्रियांका बारसे, सोनाली गव्हाणे, भिमाबाई फुगे, शैलजा मोरे, शर्मिला बाबर, संगीता भोंडवे, माधुरी कुलकर्णी, करुणा चिंचवडे, कोमल मेवानी, सुजाता पालांडे, माया बारणे, आरती चोंधे, सुनीता तापकीर, निर्मला कुटे, चंदा लोखंडे, सीमा चौघुले, माई ढोरे या महापौरपदासाठी दावेदार आहेत.  त्यापैकी माई ढोरे, झामाबाई बारणे, माया बारणे, माधुरी कुलकर्णी, निर्मला गायकवाड, भीमाबाई फुगे प्रबळ दावेदार मानले जातात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.