लायन्स क्लबचे समाजकार्य निस्वार्थीपणाचे – रामदास फुटाणे

लायन्स क्लबतर्फे महापौर राहुल जाधव यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून केंद्र, राज्य सरकार विकास कामे करते. परंतु, विकास काही केल्या पूर्ण होत नाही. सरकार बदलते, माणसे तीच असतात. सरकार पगार घेऊन काम करते तर लायन्स क्लब स्वत:च्या खिशातील पैशातून निवास्वार्थपणे समाजकार्य करते. त्यामुळे सरकार असूनही समाजकार्य करणा-या लायन्स क्लबची समाजात गरज आहे, असे मत सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी, वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले.

लायन्स क्लब ऑफ पुणे भोजापूर गोल्डच्या 12 व्या पदग्रहण समारंभात फुटाणे बोलत होते. कासारवाडी येथे रविवारी (दि.5) झालेल्या कार्यक्रमात लायन्स क्लब ऑफ पुणे भोजापूर गोल्डच्या अध्यक्षपदी सुदाम भोरे, सचिवपदी श्रीकृष्ण आत्तारकर यांची नियुक्ती करण्यात आली. लायन्स क्लबतर्फे नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव, ‘वायसीएमएच्’ रुग्णालयातील गोरगरीब रुग्णांचे अन्नदाते एम.ए. हुसैन, गुणवंत विद्यार्थी तसेच वारकरी संस्थेला आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी पदग्रहण अधिकारी जगदीश पुरोहित, डॉ. हेमंत आगरवाल, विजय आगरवाल, विजय सारडा, मावळत्या अध्यक्षा डॉ. दीपाली कुलकर्णी, खजिनदार मुरलीधर साठे, उपाध्यक्ष मुकुंद आवटे, सुमन भोंडवे, अनिल कातळे, डॉ. रोहिदास आल्हाट, पुरुषोत्तम सदाफुले, रोहित खर्गे, आदी उपस्थित होते.

फुटाणे म्हणाले, ‘आपला देश भावूक आणि भाविक आहे. धार्मिक कार्यावर वेळ आणि अधिक पैसा खर्च केला जातो. समाजात अंधश्रद्धा फोफावली आहे. त्यामुळे धर्म आणि विज्ञानाची सांगड घालण्याची मोठी जबाबदारी समाजावर आहे. आपल्याकडे इंडिया आणि भारत असे दोन देश आहेत. लायन्स क्लब भारतात राहत असून वंचित घटकांना मदत करतो. तर, इंडिया श्रीमंताचा देश आहे असे सांगत फुटाणे यांनी लायन्स क्लबने शैक्षणिक क्षेत्रात मोठे कार्य करावे, असे आवाहन केले. लायन्स क्लब स्वत:च्या खिशातील पैशातून निवास्वार्थपणे समाजकार्य करते. त्यामुळे लायन्स क्लबच्या सामाजिक कार्याचा उद्देश हा कुठल्याही राजकीय पुढा-यांपेक्षा मोठा आहे असे गौरवोद्गार फुटाणे यांनी काढले.

यावेळी बोलताना महापौर राहुल जाधव म्हणाले, ”रिक्षाचालक ते शहराचे प्रथम नागरिक हा प्रवास अतिशय खडतर होता. ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि इच्छाशक्तीच्या जोरावर मी इथपर्यंत पोहचलो आहे. लायन्स क्लब भोजापूर अतिशय चांगले समाजकार्य करत आहे. मी देखील पहिल्यापासून लायन्सचे काम करतो”

लायन्सचे अध्यक्ष भोरे म्हणाले, “लायन्स क्लबतर्फे यापूर्वी कवी समंलने, साहित्य संमलेन आयोजित करण्यात आले आहे. यापुढे लायन्स क्लबमधील डॉक्टर, उद्योजक, शिक्षक, पत्रकार सदस्यांचे सहकार्य घेऊन सामाजिक कार्य करणार आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा तसेच वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याचा आपला मानस आहे ”

एम.ए. हुसैन हे पेन विक्री करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. परंतु, रुग्णालयातील गोरगरीब, अनाथ जेवणापासून वंचित राहत असत. त्यामुळे हुसैन यांनी वायसीएम रुग्णालयातील गोरगोरगरीब रुग्णांना जेवण, औषधे देण्याचे काम सुरु केले. तसेच भिका-यांचे देखील ते पुनर्वसन करतात. त्यांच्या कार्याचा लायन्स क्लबने सन्मान करुन त्यांना आर्थिक मदत केली.

लायन्स क्लब ऑफ पुणे भोजापूर गोल्डची कार्यकारिणी – सुदाम भोरे (अध्यक्ष) मुकुंद आवटे (उपाध्यक्ष) श्रीकृष्ण आत्तारकर (सचिव)  सदस्य- डॉ. अनु गायकवाड, डॉ. प्रशांत गादिया, प्रा. शंकर देवरे, परशुराम बो-हाडे, चंद्रकांत सोनटक्के, डॉ. शंकर गायकवाड, अरुण इंगळे, तृप्ती शर्मा, लवली सिंग, सागर कौशिक.

यावेळी नवीन सदस्यांना शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिगंबर ढोकले आणि डॉ. अनु गायकवाड यांनी केले. तर, नंदा फुगे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.