BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : पर्यटकांचे आकर्षण असलेला लायन्स पाॅईंट महिनाभरापासून बंद…

स्थानिक वादाच्या पार्श्वभूमीवर वन विभागाचा निर्णय

एमपीसी न्यूज – लोणावळ्याजवळील पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षणाचे ठिकाण असलेला लायन्स पाॅईंट मागील महिनाभरापासून बंद असल्याने पर्यटकांचा मोठा हिरमोड होत आहे. तसेच स्थानिक नागरिकांवर देखील उपासमारीची वेळ आली आहे. काही दिवसांपासून हातवण व कुरवंडे गावातील नागरिकांचा लायन्स पाॅईंट येथे व्यावसायिक वाद सुरु असल्याने अनुचित घटना टाळण्याकरिता वन विभागाने तात्पुरत्या स्वरुपात हे ठिकाण बंद ठेवले आहे, अशी माहिती वन अधिकारी संजय मारणे यांनी दिली.

लोणावळा शहरापासून साधारण बारा किमी अंतरावर वन विभागाच्या हद्दीमध्ये लायन्स पाॅईंट हे निसर्गरम्य ठिकाण आहे. बारमाही थंड हवा व धुक्याची लवलाही असलेल्या या ठिकाणाची पर्यटकांमध्ये खूप क्रेज आहे. याठिकाणी वन विभागाच्या वतीने काही वर्षांपूर्वी हातवन संयुक्त वन व्यवस्थापन समितीची स्थापना करत, स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने काही दुकाने हातवण येथील स्थानिक नागरिकांना तयार करून दिली होती. तसेच वन समितीच्या माध्यमातून वाहनतळ सुरू करत उपलब्ध निधी हा याठिकाणाच्या विकासाकरिता वापरला जातो.  दिवसगणिक याठिकाणाची लोकप्रियता वाढत असल्याने लोणावळा व इतर भागातील काही मंडळींनी याठिकाणी अनधिकृतपणे दुकाने थाटली आहेत.

लायन्स पाॅईंट हे ठिकाण सध्या लुबाडणुकीचे ठिकाण बनले असून पर्यटकांना जादा दराने चहा, वडापाव, भजी, मॅगी, पाण्याच्या बाटल्या देत लूट केली जाते. हुक्का व दारु देखील चोरुन विकली जात असल्याने लायन्स पाॅईंट बदनाम झाला आहे. अनेक वेळा पोलिसांनी याठिकाणी व्यावसायिकांवर कारवाई केली आहे. यानंतरही काही प्रकार वारंवार घडत आहेत. हे सर्व प्रकार थांबवत लायन्स पाॅईंट याठिकाणी पर्यटकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, परिसराची सुरक्षा व स्वच्छता राखली जावी याकरिता विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

समित्यांमध्ये दोन्ही गावातील नागरिक आहेत. मात्र, नियमांप्रमाणे काम न करता वाद केले जातात. कुरवंडे गावाने देखील याठिकाणावर हक्क सांगत आम्हाला देखील काही दुकाने द्या अशी मागणी लावून धरली आहे. यामुळे सध्या याठिकाणी वाद निर्माण होऊ लागले आहेत. व्यवसायावरुन दोन गावात वाद सुरु झाल्याने त्यामधून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने वन विभागाने हा पाॅईंटच बंद ठेवला आहे. लायन्स पाॅईंट याठिकाणी कोणाचाही अंकुश नसल्याने येथील व्यावसायिक वादातून मागील काळात दोन जणांची हत्या झाली असून भांडणाचे अनेक प्रकार घडले आहेत.

पर्यटकांची सर्रास लूट

लायन्स पाॅईंट याठिकाणी वाहनतळापासून खाद्य पदार्थापर्यंत सर्वच ठिकाणी पर्यटकांची खुलेआम लूट केली जात आहे. याला पायबंद घालण्याकरिता वन विभागाने वन समितीच्या सहयोगाने काही समित्या याठिकाणी तयार केल्या आहेत. मात्र, नियमाप्रमाणे काम होत नसल्याने व वादाच्या घटना घडत असल्याने वन विभागाने हे ठिकाण बंद ठेवले आहे.

प्रामाणिक व्यावसायिकांचे नुकसान

लायन्स पाॅईंट याठिकाणी पर्यटकांना लुटणारे तसेच हुक्का, दारु विकणारे बदमाश व्यावसायिक आहेत. तसेच काही प्रामाणिक व्यावसायिक देखिल आहेत. नियमाप्रमाणे ठरवून दिलेल्या वेळेत इमाने इतबारे व्यावसाय करणार्‍यांवर देखिल पाॅईट बंदमुळे संक्रांत आली आहे. लायन्स पाॅईंटचा वाद असताना शिवलिंग पाॅईंट येथील दुकाने देखील वन विभागाने बंद केल्याने हातवन गावातील सर्वसामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3