Dighi: लिटल चॅम्प विजेत्या अंजली, नंदिनी गायकवाड यांच्या बहारदार गायनाने दिघीकर मंत्रमुग्ध

एमपीसी न्यूज – भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार, प्रचार व्हावा आणि नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने दिघीतील आरोही संगीत विद्यालयाच्या आयोजित वार्षिक संगीत महोत्सवात लिटल चॅम्प विजेती अंजली व नंदिनी गायकवाड या दोन बहिणीनी बहारदार गायन सादर केले. त्यांच्या गायनाने दिघीकर मंत्रमुग्ध झाले.

दिघीतील आरोही संगीत महाविद्यालयात शनिवारी (दि.13) हा कार्यक्रम झाला आहे. माजी नगरसेवक दत्ता गायकवाड आणि लिटल चॅम्प विजेती अंजली गायकवाड, नंदिनी गायकवाड यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. यावेळी नगरसेवक विकास डोळस, लक्ष्मण उंडे, नगरसेविका निर्मला गायकवाड, हिराबाई घुले, सामाजिक कार्यकर्ते कुलदिप परांडे, प्रसिद्ध गायक अंगद गायकवाड, तबला वादक रोहित गडकर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी ‘हिच आमुची प्रार्थना’ हे गीत विविध अंगानी सादर करुन रसिकांची मने जिंकली. राम मालकंस, राग भिमपलास, राग भुपाली अशा अनेक रागांवर आधारीत विविध बंदिशी सादर केल्या. यामध्ये विद्यार्थ्यांपासून गृहणी देखील सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थ्यांनी बहारदार गायन सादर केले. यामध्ये 50 हून अधिक कलाकारांनी आपल्या गायन वादनाची वैशिष्ठयपूर्ण कला सादर केली.

कार्यक्रमाच्या शेवटी लिटल चॅम्प विजेती अंजली गायकवाड व नंदिनी गायकवाड या बहिणींनी राग यमन मधील ‘गाओ गाओ मंगल गीत बजाओ’ ही ताल, तीनतालातील बंदिश सादर करत बहर आणली. त्यानंतर ‘कानडा राजा पंढरीचा’ हे भक्तीगीत आणि ‘घेई छंद मकरंद’ ही रचना सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. अंगद गायकवाड यांनी ‘धन्य भाग सेवा का अवसर पाया’ भैरवी सादर केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. युवराज शिंदे आणि रोशनी सुपे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रणजित राठोड, शिवाजी चामनर, राजपाल गायकवाड, निलेश खेडकर, उदय पाटील, रमेश गावीत, मंदार जोशी, सुनिला जिरगाळे, गंगासागर डाके, प्रियंका श्रीमंगले यांनी पुढाकार घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.