Pune News : पुणे विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडले जिवंत काडतुसे, काही वेळातच…

एमपीसी न्यूज : पुणे विमानतळावरून पुणे ते दिल्ली प्रवास करण्याच्या तयारीत असणाऱ्या एका प्रवाशाच्या  बॅगेत काडतुसे आढळून आल्याने खळबळ उडाली. मात्र काही वेळातच सुरक्षा यंत्रणेने सुटकेचा निश्वास टाकला. कारण संबंधित प्रवाशाकडे परवाना असून ही काडतुसे चुकून बॅगेत आल्याचे निष्पन्न झाले. परंतु या घटनेमुळे विमानतळावर मंगळवारी चांगलाच गोंधळ उडाला होता.  विमानतळ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पिंपरी चिंचवड परिसरातील हा प्रवाशी कुटुंबासह पुणे विमानतळावरून दिल्लीला जाणार होता. ते सुरक्षा रक्षक एजन्सी चालवतात. त्यामुळे त्यांच्याकडे पिस्तूलाचा परवाना आहे.

त्यानुसार ते फ्लाईटच्या वेळेला आले. त्यांनी चेकिंग केली. याचवेळी येथील सुरक्षा विभागाला त्यांच्या बॅगेत 9 राउंड मिळून आले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यांनी सुरक्षा विभागाला सर्व माहिती दिली. त्यानंतर सुरक्षा विभागाने हा प्रकार विमानतळ पोलिसांकडे सुपूर्द केला.

पोलिसांनी याबाबत चौकशी सुरू केली. त्यानंतर चौकशीत संबंधित व्यक्तीकडे लायसन असल्याचे दिसून आले. तसेच त्यांच्या पत्नीकडून बॅग भरत असताना काडतुसे असलेली पिशवीही त्यात टाकण्यात आली. त्यामुळे हा प्रकार घडला असल्याची माहिती विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.