Pune News : हुक्का पार्ट्यावर स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष, गुन्हे शाखेची कारवाई

एमपीसी न्यूज : पुणे शहरात अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत हॉटेल, बार, पब सुरू असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. रात्री उशीरापर्यंत चालणाऱ्या अशा हॉटेलवर कारवाई करण्याच्या सूचना देखील आहेत. मात्र असे असतानाही स्थानिक पोलिस मात्र या आदेशाकडे दुर्लक्ष करतात. परिणामी गुन्हे शाखेच्या पोलिसांना जाऊन कारवाई करावी लागते.

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने शनिवारी रात्री पुणे शहरातील कोंढवा, मुंढवा आणि येरवडा परिसरातील नामांकित हॉटेल वर कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत हे हॉटेल उघडे असल्याचे दिसून आले होते. या ठिकाणी हुक्का पार्टी देखील रंगल्या होत्या. तरुण-तरुणी नशेच्या अमलाखाली याठिकाणी वावरत असल्याचे गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या निदर्शनास आले. परिणामी पोलिसांना त्यावर कारवाई करावी लागली.

यापूर्वी अनेकदा शहरातील नामवंत हॉटेलवर कारवाई करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत हॉटेल, पब सुरू ठेवणे, हुक्का विक्री करणे असे प्रकार पुरुष शहरातील हॉटेल मध्ये सातत्याने होत असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे स्थानिक पोलिस मात्र याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करतात. गुन्हे शाखेला जे कळते ते स्थानिक पोलिसांना कळत नाही का ? असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या कडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर पोलीस आयुक्त कारवाई करणार का ? याकडे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.