Pimpri: लॉकडाउन इफेक्ट! पहिल्या तिमाहीत मालमत्ता करातून पालिका तिजोरीत केवळ 140 कोटी

Lockdown effect! Only Rs 140 crore tax collection by municipal corporation from property tax in the first quarter कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात 22 मार्चपासून लॉकडाउन सुरु आहे. त्यामुळे नागरिकांकडून कर भरण्यास अल्प प्रतिसाद मिळाला.

एमपीसी न्यूज- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनचा फटका महापालिका अर्थचक्रावर झाला आहे. त्यातच महापालिकेडून कर भरण्याची सुविधा सुरु करण्यास विलंब, नागरिकांकडून कर भरण्यास अल्प प्रतिसाद यामुळे पहिल्या तिमाहीत मालमत्ता करातून पिंपरी पालिका तिजोरीत केवळ 140.67 कोटी रुपये जमा झाले आहेत. एक लाख 15 हजार 221 मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे. मागीलवर्षी पहिल्या तिमाहीत 227.82 कोटी रुपये जमा झाले होते. त्यातुलनेत यंदा 87.15 कोटी उत्प्पन कमी मिळाले आहे.

याबाबतची माहिती कर संकलन विभागाचे प्रशासन अधिकारी रमेश वस्ते यांनी दिली. पिंपरी-चिंचवड शहरात आजमितीला पाच लाख 27 हजार 338 मालमत्ता आहेत. त्यामध्ये निवासी चार लाख 47 हजार 8, बिगरनिवासी 46 हजार 828, औद्योगिक तीन हजार 700, मोकळ्या जागा आठ हजार 781, मिश्र 15 हजार 819 आणि इतर पाच हजार 202 मालमत्ता आहेत. या मालमत्तांना महापालिकेकडून कर आकारणी केली जाते.

वर्षभर 16 विभागीय कर संकलन कार्यालयामार्फत कर वसुलीचे काम केले जाते. याशिवाय ऑनलाईन देखील कर स्वीकारला जातो. मालमत्ता करातून महापालिकेला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो. स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) बंद झाल्यापासून मालमत्ता कर हाच महापालिका उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात 22 मार्चपासून लॉकडाउन सुरु आहे. त्यामुळे नागरिकांकडून कर भरण्यास अल्प प्रतिसाद मिळाला. त्यातच कर संकलन विभागाची अनास्थाही कारणीभूत आहे.

दि. 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झाल्यानंतर तब्बल सव्वा महिन्याने म्हणजेच 10 मे रोजी ऑनलाईन कर भरण्याची सुविधा सुरु केली आहे. त्यातच 16 विभागीय करसंकलन कार्यालये अनेक दिवस बंदच होते. त्यामुळे ज्यांना कराचा भरणा करायचा आहे. त्यांना कर भरणा करता आला नाही. परिणामी, महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

चालू 2020-21 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात एक लाख 15 हजार 221 मालमत्ताधारकांनी 140.67 कोटी रुपये कराचा भरणा केला आहे. त्यामध्ये थेरगाव विभागीय कार्यालयाकडे सर्वाधिक 35.73 कोटी रुपयांचा भरणा झाला आहे. तर, पिंपरीनगर कार्यालयात सर्वांत कमी म्हणजेच 1.01 कोटीचा भरणा झाला आहे.

1 लाख 14 हजार 190 मालमत्ताधारकांनी सवलत योजनेचा लाभ घेतला आहे. 14.09 कोटींची त्यांना सवलत मिळाली आहे. आर्थिक वर्षातील केवळ नऊ महिने कर संकलन विभागाच्या हाती राहिले आहेत. या नऊ महिन्यात कर वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्याचे आव्हान विभागासमोर असणार आहे.

सामान्य कर सवलत योजनेला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ!

महापालिकेमार्फत 30 जूनपूर्वी थकबाकीसह दोन्ही सहामाहीची संपूर्ण मिळकत कर बिलांची रक्कम आगाऊ भरणा करणा-या मालमत्ताधारकांना सवलत दिली जाते.

माजी सैनिकांचे नावे असलेल्या मालमत्ता, फक्त महिलांच्या नावे असलेल्या मालमत्ता, 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या नि:समर्थ मालमत्ताधारकाच्या मालमत्तांना सामान्य कराच्या चालू मागणीत 5 ते 50 टक्क्यापर्यंत सवलत देण्यात येते.

कोविड- 19 चा प्रादुर्भाव असल्याने मालमत्ताधारकांना सवलत या कालावधीत सामान्य करातील सवलत योजनेचा लाभ घेता आला नाही. या मालमत्ताधारकांना सामान्य करातील सवलत योजनेचा लाभ मिळावा. यासाठी योजनेला 30 जुलै 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

याशिवाय जे मालमत्ताधारक थकबाकीसह (अवैध बांधकाम शास्तीकराची रक्कम वगळून) संपूर्ण मालमत्ताकराची एकरकमी 100 टक्के भरणा करतील. त्यांना आकारण्यात आलेल्या महापालिका विलंब दंड रकमेच्या 90 टक्के सवलतीच्या अभय योजनेसही 31 जुलै 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.