Blog by Harshal Alpe : श्रीमंतांसाठी कोरोना आणि गरिबांसाठी लॉकडाऊन, दोन्ही अडचणीचेच!

एमपीसी न्यूज ( हर्षल विनोद आल्पे ) – वर्षा मागं वर्ष जातात , परिस्थिती मात्र बदलवण्यासाठी आपला संघर्ष चालूच असतो , पण जेव्हा मागच्या वर्षीसारखीच परिस्थिती पुन्हा दाराशी येऊन ठाकते, तेव्हा मात्र आपण परिस्थितीशी लढता लढता काही क्षण हतबल हे होतोच होतो , हे असंच काहीसं सध्या होतंय असं वाटतं आहे .

राज्यात पुनश्च हरी ओम म्हणता म्हणता आपण ‘पुनश्च लॉकडाऊन’चा मंत्र ऐकू लागलो आहोत , काही ठिकाणी तो झालाही आहे, मूळ प्रश्न आणि धडपड जागच्या जागीच आहे , फक्त कलेंडरचं पान फक्त उलटल्यासारखं वाटत आहे , यातून बाहेर पडणं आणि आणि ही हतबलता नष्ट करणे यावर खरंच हाच मार्ग आहे का ?

विज्ञानाच्या या जगात हे असं हतबलपणे घरात बसणे हे खरच व्यवहार्य आहे का ? एक टिनपाट रोगजंतू अख्खं जग एका रात्रीत बंद करू शकतो, हे जन्मात होऊ शकेल असं वाटलंच नव्हतं ….आणि त्यामुळेच भविष्याबद्दल भीती वाटते आहे …. की ही साखळी ही अशी कुठपर्यंत चालणार ??? की काही झालं की पुन्हा सातत्याने लॉकडाऊन हाच मार्ग? असं होऊ नये असं सगळ्यांनाच वाटत असेल आणि त्यात काहीही चुकीचे नसेल.

लॉकडाऊन घोषित करणे तसे सोपे असेलही, पण त्याने होणारा अर्थव्यवस्थेवरचा परिणाम हा फारच दूरगामी असतो , यातूनच समाजातील दरीही प्रचंड वाढत असते , जे आर्थिकदृष्ट्या स्थिर असतात किंवा ज्यांना काही वेळ काम केले नाही तरी चालू शकते, किंवा जे पिढीजात श्रीमंत म्हणून गणले जातात, त्यांना हे कदाचित सोपे वाटतही असेल, पण ! जे रोजच्या रोज काम करून आपल पोट भरतात , ज्यांचं घरच त्यांच्या काम करण्यावर चालते, त्यांचे काय ? हा मूळ प्रश्न आहे. अशा वेळी पोट की आजार ? हा प्रश्न असतोच , पण त्याही वेळी गरीब, मध्यमवर्गीय समाज हा पोटालाच महत्त्व देतो , आणि त्यात काही ही चूक नाही, आजार आहे तो बराही होऊ शकतो, योग्य वेळी उपचार केले, परवडेल असा तरी ही बरा होऊ शकतो , पण एकदा झालेली आर्थिक कोंडी ती कशी भरून काढणार?

मागच्या वर्षी जेव्हा लॉकडाऊन होता, त्या वेळी एक आशा वाटत होती , की एकदा का ती लस आली की हे सगळ थांबेल, जीवन सुरळीत होईल , पण…. आता लस आलीये , हळू हळू सर्व नागरिकांपर्यंत ती पोहोचतीये , लोकांनी ती घेतली पाहिजे , पण…. तरीही रुग्णांची संख्या कमी का होत नाहीये ??? उलट वाढता वाढता वाढे, असेच सुरू आहे , काहींनी लस घेतली तरीही त्यांना कोरोना होतोच आहे.

तीव्रता कमी असेल पण ! तो होतोय हे वास्तव आहे, आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रयत्न होत आहेत, हे त्या क्षेत्रातील तज्ज्ञ बोलल्यावर कळते आहे, ते प्रयत्न ही अपुरे आहेत, असेही कळते आहे. यातून प्रश्न निर्माण होतो की आपण आजवर आरोग्याला काहीच महत्त्व दिले नाही का ??? जे प्रशासनातील लोक आहेत, जे शासनकर्ते लोक आहेत , त्यांनी एकदा या गोष्टीचा शांतपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

या लॉकडाऊन ऐवजी आपण एखादा असा मार्ग काढू शकत नाही आहोत का, ज्याने गरीब , मध्यमवर्गीय , छोटे व्यापारी ,रोजंदारीवर काम करणारे यांचे काम थांबणार नाही , आणि कुणावरही उपासमारीची वेळ येणार नाही. सर्वसामान्य रिक्शा चालवणार्‍या एका इसमाशी बोलल्यावर “ अभी लॉकडाऊन आया तो हम मर गए , वो भूकमरी से मरने से अच्छा है , रोग से मरे हम, काम तो कर रहे है , कुटुंब का पेट तो पाल रहे है !” हे असे भयाण वास्तव त्याने एका वाक्यात वर्णन केले आणि खरच विचार करायला भाग पाडले …

जे कुणी हा लेख वाचत असतील ,त्या प्रशासनातल्या लोकांनी विचार करावा आणि मार्ग काढावा भविष्यासाठी , कारण जर हे असेच नवनवीन रोग येऊन त्यांनी जर असे विश्वच बंद पाडले तर जगायचे कसे , हाच प्रश्न निर्माण होईल ,आणि आपण अराजकतेकडे जाऊ इतकेच ….

सरकारमधल्या आणि या मेडिकल क्षेत्रातल्या संवेदनशील तज्ज्ञांनी या बाबतीत याही बाजूने विचार करून पुढचा निर्णय घ्यावा एवढेच वाटते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.