Pimpri News : ‘कोरोना प्रतिबंधासाठी लॉकडाऊन म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर’ – प्रदीप नाईक 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याने काही जिल्ह्यात निर्बंध लादले आहेत. लॉकडाऊन शिथील केल्यानंतर नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढल्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याचे तज्ञ सांगत आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याबाबत हलचाली सुरू आहेत. पण, ‘कोरोना प्रतिबंधासाठी पुन्हा लॉकडाऊन करणं म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर’ असे मत माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी व्यक्त केले आहे. 

प्रदीप नाईक यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवले आहे. या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, राज्यात आटोक्यात आलेला कोरोना संसर्ग पुन्हा वाढला कसा याचा विचार व्हायला हवा. यासाठी सर्वसामान्य जनता जितकी जबाबदार आहे तितकेच नेते मंडळी देखील जबाबदार आहेत. राजकीय सभा, मेळावे, विवाह समारंभात तूफान गर्दी होते आणि सर्रास नियमांची पायमल्ली होत असल्याचे त्यांनी या निवेदनात नमूद केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन बाबत विचार करत असाल तर, तो विचार मनातून काढून टाका असा सल्ला नाईक यांनी आपल्या निवेदनात दिला आहे. अनेक लोक रोजंदारीवर काम करुन उदरनिर्वाह करत असतात. आता कुठं अर्थव्यवस्था रुळावर येत आहे. लॉकडाऊन ऐवजी सरकारने कोरोना चाचण्या वाढवण्यावर भर द्यावा तसेच, कोरोना विषयक जनजागृती करत मास्क वाटप करावे आणि लसीकरण करावे असा सल्ला नाईक यांनी आपल्या निवेदनात दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.