Lockdown in Pandharpur : कोरोनामुळे पंढरपूरमध्ये 2 जुलैपर्यंत लाॅकडाऊन

Corona causes lockdown in Pandharpur till July 2

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात 30 जून रोजी दुपारी दोन वाजल्यापासून 2 जुलैपर्यंत लाॅकडाऊन (संचारबंदी) लागू करण्यात आली आहे. या लाॅकडाऊनमध्ये सर्व अत्यावश्यक सेवा तसंच परवानगी असलेल्या पासधारकांना सूट असणार आहे.

सोलापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी याबाबत एका वृत्तवाहिनीला माहिती दिली आहे. आषाढी वारी अखेरच्या टप्प्यात आहे. 1 तारखेला आषाढी एकादशी आहे. परंतु, कोरोनामुळे कोणालाही पंढरपुरात प्रवेश दिला जात नाही. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शहरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारीच्या माध्यमातून दरवर्षी 12 ते 15 लाख वारकरी पंढरपुरात येतात. परंतु यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर ठरवून दिलेल्या मानाच्या पालख्यांनाच शहरात प्रवेश दिला जाणार आहे. शहरात नाकाबंदीही केलेली आहे.

गर्दी होऊ नये यासाठी 29 जून ते 2 जुलैपर्यंत संचारबंदीचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु व्यापारी आणि लोकप्रतिनिधी सोबत चर्चा करुन 30 जून रोजी दुपारी दोन वाजल्यापासून 2 जुलैपर्यंत संचारबंदीचा नवीन प्रस्ताव मान्य केला आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे.

दरम्यान, मंदिर प्रदक्षिणा व नगर प्रदक्षिणेसाठी पासधारकांशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. नगरपालिकेच्या माध्यमातून बॅरिकेटिंग केले आहे.

याशिवाय शहरात 1200 पोलीस कर्मचारी आणि 800 होमगार्डचा बंदोबस्त ठेवला असल्याची माहिती झेंडे यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.