Pimpri News : लॉकडाऊन हा पर्याय नाही, लसीकरण वाढवा ; उद्योजकांची मागणी 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले असून, प्रशासनाला तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुण्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर 1 ते 2 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल असे सांगितले आहे.

मात्र, पिंपरी चिंचवड मधील उद्योजकांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. लॉकडाऊन हा पर्याय नसून, लसीकरण वाढवण्यावर प्रशासनाने भर द्यावा अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. दररोज पंचवीस ते तीस हजारांच्या घरात कोरोना रुग्ण वाढत आहेत. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. टास्क फोर्स सोबत झालेल्या बैठकीत त्यांनी लॉकडाऊनची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

लॉकडाऊनला उद्योजकांनी विरोध केला असून हा पर्याय नसल्याचे म्हटले आहे. 

पिंपरी चिंचवड लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे म्हणाले, ‘कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे त्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. त्याऐवजी आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यावर अधिक भर दिला पाहिजे. लस उपलब्ध झाली असून जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यावर प्रशासनाने भर दिला पाहिजे.

लघुउद्योजकांचे अधिक हाल होत आहेत. कर्जाचे हप्ते, लाईट बिल, कामगारांचे पगार सुरुच आहेत. तसेच, लॉकडाऊन झाल्यास उद्योगावर अवलंबून असलेल्या इतरांना देखील आर्थिक तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन उद्योगांना फायदेशीर ठरणार नाही.’

पिंपरी चिंचवड लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष दिपक फल्ले म्हणाले, ‘एक वर्षापूर्वी लॉकडाऊन गरजेचा होता तेव्हा आरोग्य सुविधांची कमतरता होती आणि इतर कारणेही होती. पण, एका वर्षानंतर जेव्हा पुरेशी वैद्यकीय साधने उपलब्ध असताना लॉकडाऊन हा पर्याय होत नाही. लस उपलब्ध झाली आहे, जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर दिला पाहिजे. ज्या शहरात जास्त रुग्ण वाढत आहेत त्याठिकाणी 30 वर्षांवरील सर्वांना लस दिली जावी.’

‘सरकार ने औद्योगिक ऑक्सिजन पुरवठ्यावर पुन्हा निर्बंध लादले आहेत. वीजबिल, कर्जाचे हप्ते, कामगारांचे पगार या गोष्टी थांबत नाहीत. त्यामुळे लॉकडाऊन करण्याऐवजी लसीकरण वाढवण्यावर प्रशासनाने भर द्यावा’, असे फल्ले म्हणाले.

फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीचे सचिव दिलीप बटवाल म्हणाले, ‘उद्योगावर देशाचं आर्थिक चक्र सुरू आहे. पुन्हा लॉकडाऊन केला तर, ते थांबेल. तसेच, कामगार व उद्योगावर अवलंबून इतरांना आर्थिक झळ बसेल. त्यामुळे उद्योगांसाठी लॉकडाऊन परवडणारे नाही’

बांधकाम व्यावसायिक राजेश अग्रवाल म्हणाले, ‘लॉकडाऊनचे नोकरी, व्यवसाय व उद्योगावर गंभीर परिणाम होतील. मुख्यत्वे हॉटेल इंडस्ट्रीज वर ह्याचे खूप वाईट परिणाम होतील. मिळकत कर न भरल्यामुळे महानगरपालिकेने जप्तीच्या नोटीस पाठवल्या आहेत. त्यामुळे चौफेर कोंडी झाली आहे. अशात लॉकडाऊन परवडणारे नाही. त्याऐवजी लसीकरण वाढवावे, कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यावर दंड वाढवावा पण, एकदिवस देखील लॉकडाऊन करु नये.’

सुरवातीला केलेल्या लॉकडाऊनच्या अनेक उद्योजकांना झळा बसल्या आहेत. त्यातून स्थिरस्थावर होत असताना पुन्हा त्यांच्यावर लॉकडाऊनची टांगती तलवार आहे. उद्योजकांनी मात्र, पुनःश्च लॉकडाऊनला विरोध केला असून, सरकारने लसीकरण वाढवावे अशी मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.