Lockdown: पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा 10 दिवसांचा लॉकडाऊन; अजित पवारांचे निर्देश, आयुक्त ठरवणार तारीख

Lockdown: Lockdown again in Pune, Pimpri-Chinchwad; Ajit Pawar's instructions, date to be decided by the Commissioner यावेळी पुणे शहराच्या शेजारी असलेल्या हवेली तालुक्यातही लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज- वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा 10 दिवसांचा लॉकडाऊन सुरु करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. अजित पवार आणि पुणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. प्रशासनाने वारंवार सूचना करूनही विनाकारण लोक रस्त्यांवर फिरत असल्याने अजित पवार यांनी हा धडाकेबाज निर्णय घेतला आहे. मागील बैठकीत रुग्ण आटोक्यात आणण्याचा आदेश पवार यांनी अधिकाऱ्यांना दिला होता. यावेळी पुणे शहराच्या शेजारी असलेल्या हवेली तालुक्यातही लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, हा लॉकडाऊन सोमवारी (दि.13) की मंगळवार (दि.14) पासून सुरु करायचा याचा निर्णय घेण्याचे अधिकार अजित पवार यांनी आयुक्तांना दिल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर या लॉकडाऊनमध्ये कोणत्या सेवा सुरू करायचा, कोणत्या बंद ठेवायच्या याचा निर्णयही दोन्ही महापालिका आयुक्त घेणार आहेत.  

लॉकडाऊन कधी सुरु करायचा याचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. सोमवारी मध्यरात्री नंतर लागू केला तर तो नागरिकांसाठी 14 तारखेपासून लागू होईल. मात्र 13 तारखेपासून लॉकडाऊन लागू केला तर तो सोमवारी सकाळपासून लागू होणार असा अर्थ होतो.

नागरिकांना काही वस्तू खरेदी करण्यासाठी, अत्यावश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी वेळ देणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितल्यानंतर त्यांनी हा निर्णय दोन्ही महापालिकांच्या आयुक्तांवर सोपवला आहे.

पुणे शहरात कोरोनाचे 25 हजारांच्या पुढे रुग्ण गेले आहेत. रोज 1 हजारांच्या वर रुग्ण आढळून येत आहेत. त्याचबरोबर दररोज 4 हजार 500 च्या वर कोरोना चाचण्या होत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like