Pune News : प्रसिद्ध क्राऊन प्लाझा हॉटेलला कुलूप लावत ८ कोटींची खंडणी मागितली

एमपीसी न्यूज : पुण्यातील प्रसिद्ध क्राऊन प्लाझा हॉटेलला कुलूप लावून ते बंद करत ८ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी जागतिक दर्जाच्या ‘इंटर कॉन्टीनेन्टल हॉटेल्स ग्रुप’ (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड ग्रुपच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात पदाधिकारी सुदीप जैन (नवी दिल्ली), पासकल गाविंन, नॉर्टन परेरा (हरियाना), व्यंकटेश गोगातम, अॅनंजेलीन याप तसेच मॅनेजर फिनो बाबू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिपक रहेजा (वय ६७) यांनी तक्रार दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे न्युओ कॅर्पिकॉर्न प्लाझा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आहेत. दरम्यान, त्यांच्या कंपनीने २०१६ मध्ये इंटर कॉन्टीनेन्टल हॉटेल्स ग्रुप’ (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड ग्रुपला क्राऊन प्लाझा हॉटेल चालविण्यास दिले होते. त्याबाबत लेखी करारनामा झाला होता. मात्र, संगणमतकरून हॉटेल मॅनेजर बाबू यांनी त्यांच्या व्हॉट्सअपवरून फिर्यादी यांना ५ कोटी ८६ लाख ९७ हजार ३२७ रुपयांची रक्कम थकित असल्याचे सांगितले. परंतु, आरोपींनी १४ कोटींची अवास्तव मागणी केली.

फिर्यादी यांचा विश्वासघात केला. तर, फायर अलार्म सिस्टीम व बॅगेज स्कॅनर बंद असल्याने ग्राहकांची सुरक्षितता धोक्यात आणली. तर, क्राऊन प्लाझा हॉटेलला कुलूप लावून बंद केले असून, त्यांना मोठ्या रकमेची मागणी करत धमकावण्यात आले आहे. जुलै २०२१ मध्ये फिर्यादींनी ८५ लाख रुपये दिले असताना त्यांच्याकडे ८ कोटी १३ लाख २ हजार ६७३ रुपयांची खंडणी मागणी करत दाखल केलेली केस मागे घेण्यास व हॉटेल बंद पाडण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.