Pimpri : देशाला कुपोषण मुक्त करण्यासाठी उपक्रम राबवा, श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जतमध्ये तीन महिन्यांपूर्वी 171 मुले कुपोषणाने बाधित झाली आहेत. त्यातील 74 मुले अती कुपोषित झाली आहेत. सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. त्यामुळे सरकारने कुपोषणाकडे गांभीर्याने पहावे. देशाला कुपोषण मुक्त करण्यासाठी उपक्रम राबविण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली. 

लोकसभेत बोलताना खासदार बारणे म्हणाले, स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही सरकारला देश कुपोषणमुक्त करण्यासाठी विविध उपक्रम राबवावे लागत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जतमध्ये तीन महिन्यांपूर्वी 171 मुले कुपोषणाने बाधित झाले आहेत. त्यातील 74 मुले अती कुपोषित झाली आहेत. सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

लोकसभेत 5 डिसेंबर 2014 रोजी मी तारांकित प्रश्न विचारला होता. कुपोषणाच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले होते. त्यावेळी सरकार लवकरात-लवकर देशाला कुपोषण मुक्त करेल, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले होते. त्यासाठी विविध कार्यक्रम राबविले जातील. परंतु, 2014 नंतर आजपर्यंत देशभरात कुपोषित बालकांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे कुपोषणाकडे सरकारने गांभीर्याने पहावे. त्यासाठी जास्तीत-जास्त उपक्रम राबविण्यात यावेत, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.